अहमदनगर (प्रतिनिधी) -

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठेच्या अटकपूर्व जामिनावर पुढील आठवड्यात सुनावणी

होणार आहे. सुनावणीची ऑनलाईन तारीख घेणार असल्याची माहिती अॅड. संतोष जाधवर यांनी दिली. बोठे याने अॅड. जाधववर यांच्यामार्फत औरंगाबाद हायकोर्टात 31 डिसेंबरला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

30 नोव्हेंबरला जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेत पोलिसांनी 5 जणांना अटक केली. अटकेतील आरोपींच्या माहितीनुसार हत्याकांडाचा सूत्रधार बोठे असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार पोलिसांनी त्याचा आरोपींमध्ये समावेश केला. तेव्हापासून तो पसार आहे. त्याने नगरच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला, पण तो नगरच्या कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याने आता अॅड. जाधवर यांच्यामार्फत हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असून सुनावणीची ऑनलाईन तारीख घेणार असल्याचे अॅड. जाधववर यांनी सांगितले.

स्टँडिंग... कोर्टात हस्तक्षेप अर्ज

बाळ बोठे याने पोलिसांच्या स्टँडिंग वॉरंट अर्जाला आव्हान दिले आहे. पारनेर न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंटविरोधात बोठे याच्यावतीने अॅड. संकेत ठाणगे यांनी अर्ज दाखल केला. त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराडे यांच्यासमोर मंगळवारी अॅड. ठाणगे यांनी युक्तिवाद केला. अॅड. ठाणगे यांनी युक्तिवाद करताना म्हणाले, बोठे याचा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 31 डिसेंबरला अर्ज दाखल केला आहे. रेखा जरे हत्याकांडातील तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी न्यायालयात स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज केला आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. तशी कायद्यात तरतूद आहे आणि अधिकार देखील आहेत. त्यानुसार बोठे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय व्हायचा आहे. त्या अगोदर पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केला आहे. एकप्रकारे बोठेला पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे. पोलिसांना बोठेला जामीन मिळवून द्यायचा नाही, असेच यातून दिसते आहे. बोठे अटक टाळत नसून, अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तो त्याला अधिकार आहे. असा युक्तिवाद करत अॅड. ठाणगे यांनी इतर खटल्यातील दाखले न्यायालयासमोर सादर केले. स्टँडिग वॉरंटवर आज (बुधवार) निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.