मला हातकडी घालू नका, कोर्टाने बोठेची मागणी फेटाळली
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कारागृहातून न्यायालयात आणताना व न्यायालयातून कारागृहात नेताना मला हातकडी घातली जाऊ नये, अशी मागणी रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याने केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळली. त्यामुळे यापुढेही त्याला हातकडी घालूनच न्यायालयात आणले जाणार आहे. दरम्यान, याप्रकरणी आज (सोमवारी) सुनावणी होणार आहे.
रेखा जरे यांच्या खून प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात सुरू आहे. बोठे हा न्युज पेपरचा संपादक राहिला आहे. अधिक तो वकील आहे. या कारणामुळे त्याला हातकडी लावू नये अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात देण्यात आलेला होता. त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे सादर करताना या मागणीस विरोध केला. बोठे याचा हातकडी न लावण्यासंदर्भात अर्ज नामंजूर व्हावा, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर हातकडी न लावण्याची मागणी करणारा अर्ज नामंजूर केला असल्याची माहिती अॅड. सचिन पटेकर यांनी दिली.