रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे फरार घोषित

9 एप्रिलपर्यंत हजर न झाल्यास संपत्तीवर टाच
रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे फरार घोषित

अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला पारनेर न्यायालयाने

फरार घोषित केले आहे. न्या. उमा बोर्‍हाडे यांनी हा आदेश दिला. 9 एप्रिल पर्यंत बोठेला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्याबाबत सांगितले आहे. जर तो हजर राहिला नाही तर त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्टॅडिग वॉरंट काढूनही बोठेला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. शेवटी पोलिसांनी न्यायालयात धाव घेत बोठेला फरार घोषित करण्यात यावे असा अर्ज दिला होता. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम 82 सदर अर्ज दाखल केला होता. 1 मार्च रोजी दाखल केलेल्या या अर्जासंदर्भात न्या. बोर्‍हाडे यांच्या न्यायालयासमोर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर अतिम आदेश न्यायालयाने गुरूवारी दिला. न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मंजूर केला असून बोठे याला फरार घोषित केले आहे.

दरम्यान, रेखा जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुध्द मागील महिन्यात पोलिसांनी पारनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणातील आरोपी बोठे हा अद्याप पसार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. त्यातच आता न्यायालयाने देखील बोठे याला फरार घोषित केले आहे. 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाला आता तीन महिने पूर्ण झाली आहे. हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार बोठे याला अटक केल्यानंतर हत्याकांडासंदर्भात अनेक घटना पुढे येणार आहे. दरम्यान बोठे याच्या शोधासाठी पोलिसांनी नव्याने दोन पथके स्थापन केली असून आता चार पथके बोठे याचा शोध घेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com