अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली.

बोठे याने आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख त्यात केला होता. नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबातील या व्यक्तींना संपर्क करून कळविण्यासाठी त्यात काही संपर्क नंबर त्याने नमूद केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली.

दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर बोठे याने आजारपणाच्या तक्रारी केल्याने त्याची वैद्यकीय तपासणीही करून घेण्यात आली. बोठे याला पारनेर पोलीस ठाण्यात कोणतीही व्हीआयपी वागणूक दिली जात नसून केवळ आरोपीची सुरक्षा आणि संभाव्य कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

बोठेला पारनेर पोलीस ठाण्यात व्हिआयपी वागणूक मिळत असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्याने रविवारी अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परीषदेत याबाबत थेट खुलासा केला. यावेळी अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील उपस्थित होते. अधीक्षक पाटील म्हणाले, सुरवातीला काही पथके हैदराबादला रवाना केली. त्या पथकांनी रेकी केल्यानंतर आरोपीचा सुगावा लागला.

मात्र, आरोपीचे बरेच नेटवर्क मोठे असल्याने आणि आरोपी बरोबर महिलाही असल्याने व त्यांना संरक्षण देणारी यंत्रणा देखील मोठी असल्याने, आणखी काही पथकासोबत महिला अधिकारीही रवाना झाल्या.

तिथे तपास कामात अडथळे येऊ नये, बोठे याने महाराष्ट्र पोलिसांची वाहने ओळखू नये, यासाठी पोलिसांनी स्थानिक वाहनांचा वापर केला. हैद्राबादमध्ये बोठेचा शोध घेत असतांना आधी त्याला सर्वप्रकारची मदत करणार वकील व त्याचा एक साथीदार हाती लागला. यामुळे नगर पोलिसांचे काम अधिक सोपे झाले. या दोघांकडून बोठेशी संपर्क होऊ शकला. पोलिसांनी पाच हॉटेलांवर छापे टाकले आणि शेवटी सहाव्या हॉटेलमध्ये बाहेरून कुलूप असलेल्या खोलीत बोठे सापडला.

खोलीचा दरवाजा तोडून पोलीस जेव्हा आत शिरले यावेळी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता बोठे स्तब्ध उभा होता. त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडे एक सुसाईड नोट सापडली ज्यात माझा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास खालील लोकांना संपर्क करावा. त्यात त्याने कुटुंबियांचे नावे व नंबर लिहिलेले होते. आत्महत्याचा उल्लेखही त्यात होता. परंतू, कोणत्या कारणातून आत्महत्या करणार याचा उल्लेख त्यात नसल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी बनाव

बोठे याने एकदा राजकोंडा पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन रजिस्टरमध्ये रितसर नोंदणी केली आणि कोणालाही न भेटता खालच्या खालीच तो पसार झाला. बोठे राजकोंडा आयुक्त कार्यालयात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. परंतु, काही मिनीटांच्या अंतराने बोठे त्याठिकाणाहून पसार झाला. आयुक्त कार्यालयात जाऊन नोंदणी करण्यामागचा हेतू असा होता की, आपण कायद्याला मदत करत आहोत, सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अपिल करत आहोत, असा बनाव त्याने रचला होता.

पकडल्यापासून सतत आरोग्याच्या तक्रारी

पकडल्यानंतर बोठेने आपल्याला हैदराबाद मध्येच न्यायालयात हजर करावे यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्याने मला छातीत दुखतंय, मला घाम येतोय, असही कारणं देण्यास सुरवात केल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला महाराष्ट्राच्या सिमेत आणण्यास प्राधान्य दिले. तरीही बोठे सातत्त्याने आरोग्याच्या तक्रारी करू लागल्याने त्याला सोलापूरमधील खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा इसीजी काढून त्याच्या तपासण्या करण्यात आल्या व पुन्हा नगरचा प्रवास सुरु झाला.

म्हणून मोकळ्या बराकीत वास्तव

समाजमध्ये कुठलाही चुकीचा संदेश जाऊ नये, याची सर्व काळजी पोलीस प्रशासनाने घेतली आहे. पारनेरमध्ये देखील त्याला एका मोकळ्या बराकीत आत्मघाती कोणतीही वस्तू मिळणार नाही याची काळजीने घेऊन तसेच तो सीसीटीव्हीच्या देखरेखी खाली राहील यावर कटाक्षाने लक्ष देण्यात आले आहे. बोठेला कुठलीही व्हीआयपी वागणूक दिली जाणार नाही. याची पोलीस प्रशासन दक्षता घेणार असल्याचे त्याला सुरक्षेचा विचार करून आणि कोणताही बहाणा, बनाव करता येऊ नये, यासाठी स्वतंत्र पोलिस कोठडीत ठेवण्यात आले. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. आरोपी पत्रकार आणि वकीलही आहे. त्यामुळे कायद्याच्या माहितीचा स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी त्याच्याकडून पुरेपूर वापर केला जात आहे.

जबरदस्त कामगिरी; पथकाचा गौरव

परप्रांतात जाऊन संवादाची भाषा आणि अन्य अडचणींवर मात करून सहा पोलिस पथकांनी ही कारवाई केली. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड, आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक ज्योती गडकरी, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप, एलसीबीचे दिवटे, सोलापूरच्या निरीक्षक पाटील यांचा पथकाचा समावेश आहे. त्याबद्दल त्या पथकातील अधिकारी व कर्मचार्यटांचा गौरव पोलीस अधीक्षक पाटील यांनी केला. त्यांना प्रमाणपत्र आणि रोख बक्षीसेही देण्यात आली.

जामखेड न्यायालय रात्री उघडले

बोठे याला मदत करणारा वकील जर्नादन अकुला चंद्रप्पा याच्या मुसक्या पोलिसांनी आवळ्या. त्याने स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांना अट घातली. 24 तासांपेक्षा जास्त तुम्ही मला ताब्यात ठेऊन शकत नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र 24 तासात त्याला पारनेरपर्यंत येणे शक्य नसल्याने रात्री 11:30 वाजता जामखेडमध्ये न्यायालयात हजर करून तेथून त्याचा ट्रॅझिट रिमांड घेण्यात आला आणि मग दुसर्या दिवशी त्याला पारनेर न्यायालयात हजार करण्यात आले.