जरे हत्याकांड : चोळके, भिंगारदिवेचा जामीन अर्ज नामंजूर

आरोप निश्‍चितीसाठी 23 सप्टेंबरला सुनावणी
जरे हत्याकांड : चोळके, भिंगारदिवेचा जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर (प्रतिनिधी)

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेत असलेले आदित्र चोळके व सागर भिंगारदिवे यांचे जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने नामंजूर केले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या बारापैकी दोन जण गैरहजर असल्याने त्यांना शेवटची संधी म्हणून त्यांचे गैरहजर राहण्याचे अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, पुढच्या सुनावणीस हजर राहिले नाही व त्यांचे वकिलही हजर राहिले नाही तर त्या तारखेस आरोप निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करून खटला सुनावणी सुरू करण्याची तंबी न्यायालयाने सर्वांना दिली.

रेखा जरे हत्याकांडातील चोळके व भिंगारदिवे यांनी जामिनावर सुटका करण्याची मागणी केली होती. त्याला सरकार पक्षातर्फे काम पाहणारे अॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी आक्षेप घेतला होता व त्यांनी याबाबत लेखी म्हणणे मांडले होते. या प्रकरणात त्यांना सहाय्य करणारे अॅड. सचिन पटेकर यांनी या म्हणण्यानुसार न्यायालयासमोर युक्तिवाद केला होता. या खून प्रकरणातील बाळ बोठे याच्याशी काहीही संबंध नाही व त्याच्याशी कधी भेटही झाली नसल्याचा दावा चोळके याने केला होता तर पत्नी आजारी असल्याने जामीन मिळण्याची मागणी भिंगारदिवे याने केली होती.

मात्र, अॅड. पटेकर यांनी चोळके व बोठे यांचे एकमेकांशी झालेले संभाषण, खुनासाठी वापरलेल्या चाकूची चोळकेने केलेली खरेदी व या अनुषंगाने घडलेल्या घटनांच्यावेळी आलेले त्यांचे संबंध न्यायालयासमोर मांडले तसेच भिंगारदिवे याला अटक केल्यापासून त्याची पत्नी आजारी असून, त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्य आतापर्यंत तिची देखभाल करीत असल्याने जामिनावर सोडण्याची गरज नाही, असे म्हणणेही त्यांनी मांडले होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ६ सप्टेंबरला ऐकल्यावर न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला व चोळके आणि भिंगारदिवे यांचे जामीन मागणी अर्ज नामंजूर केले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com