जरे हत्याकांड : गुन्ह्यातून वगळण्याची आरोपींची मागणी न्यायालयाने फेटाळली

खटला वर्ग प्रकरणात वकीलपत्र दाखल
जरे हत्याकांड : गुन्ह्यातून वगळण्याची आरोपींची मागणी न्यायालयाने फेटाळली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यातून वगळण्याची तीन आरोपींनी केलेली मागणी न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. या प्रकरणी आता येत्या 30 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चकाली व अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ (तिघेही रा. हैदराबाद, आंध्र प्रदेश) या तिघांनी गुन्ह्यातून वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने रेखा जरे हत्याकांड खटला नाशिक वा ठाणे न्यायालयात वर्ग करण्याची मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली असून, यात फिर्यादी सिंधू वायकर यांच्यावतीने वकीलपत्र दाखल केल्याची माहिती त्यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी दिली. या याचिकेची प्राथमिक सुनावणी प्रतिक्षेत आहे.

जरे हत्याकांड प्रकरणी बाळ बोठे पसार असतानाच्या काळात मदत केल्याबद्दल शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चकाली व अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ यांचा या गुुन्ह्याच्या आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा दावा करीत या गुन्ह्यातून वगळण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर फिर्यादी वायकर यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी आक्षेप घेताना हे तिघेही मुख्य आरोपींच्या संपर्कात नसले तरी पसार असतानाच्या काळात बाळ बोठेला नगरमधून मदत करणारा आरोपी महेश तनपुरे याच्या संपर्कात होते.

त्यामुळे यांना गुन्ह्यातून वगळले तर ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात तसेच खटला प्रलंबित ठेवू शकतात, असा दावा अ‍ॅड. पटेकर यांनी केला होता. सुनावणीनंतर यावरील निकाल प्रतिक्षेत होता. न्यायालयाने मंगळवारी तो देताना तीनही आरोपींची मागणी फेटाळली असल्याचे अ‍ॅड. पटेकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com