सचिन दसपुते

अहमदनगर -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अटक करण्यात

पोलिसांना 102 दिवसांनंतर यश आले. बोठे हा पोलिसांना सहज हाती लागला नाही. हैदराबादमध्ये तीन वेळा चकवा देणारा बोठे अखेर चौथ्यांदा पकडला गेला. पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच तो हैदराबादमधून भोपाळला सटकण्याच्या तयारीत होता. परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्या.

कुख्यात गुन्हेगारांना कायम आश्रय देणारा वकील जनार्दन अकुले चंद्रप्पा बोठेच्या मदतीला हैदराबादमध्ये धावून आला. सावेडीचा महेश तनपुरे हा पंटर बोठेच्या संपर्कात होता. बोठे उस्मानिया विद्यापीठाचा आधार घेऊन तेथे लपून बसला असेल याची कल्पनाही पोलिसांना नव्हती. बोठेच्या शोधासाठी पोलिसांवर दबाव होता. बोठेच्या विरोधातील भक्कम पुरावे पोलिसांनी जमा करण्यावर भर दिला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते.

बोठे हा हैद्राबादमधील दिलसूकनगर परिसरात पेईंगगेस्ट म्हणून राहत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्याठिकाणी हजारो लोक अशाच पद्धतीने राहतात. त्यामुळे बोठेला शोधून अटक करण्याचे मोठे आव्हान होते. पोलीस त्याठिकाणी पोहोचले पण बोठेने पोलिसांना चकवा दिला. यानंतर पोलीस हतबल न होता शोध मोहीम सुरू ठेवली. पोलिसांनी खबर्यांचे जाळं निर्माण केले. सोबत तांत्रिक तपासावर भर दिला. दरम्यान, पोलिसांनी बोठेला मदत करणार्या तीन पंटरला उचलले. याची कुणकुण वकील जनार्दन व बोठेला लागली होती. त्यांनी बिलानगरमधील एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी आश्रय घेतला. तो मुस्लिम व्यक्ती त्या वकिलाचा मित्र होता. वकील जनार्दन बोठेला मदत करत असल्याचे पोलिसांना पुराव्यानिशी माहिती झाले. पोलिसांनी वकील जनार्दनच्या मुसक्या आवळल्या. मदत करणारा वकिलच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पोलीस आपल्या मागावर असल्याची पक्की खात्री बोठेला झाली. त्याने राजकोंडा पोलीस आयुक्त कार्यालय जाण्याचा प्रयत्न केला.

आयुक्त कार्यालय त्याने रजिस्टरमध्ये नोंद केली. आपण पोलिसांच्या संपर्कात असून फरार नसल्याचा त्यामागचा उद्देश होता. परंतु तो पोलीस आयुक्त कार्यालय नोंद करून काही मिनिटात बोठे तेथून पसार झाला. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. परंतु तेथे ही बोठेने पोलिसांना चकवा दिला. तीन दिवसांत तीन चकवे दिल्यानंतर पोलिसांनी चौथ्या दिवशी मोहीम सुरू केली. त्यावेळी बोठेला मदत करणारे पोलिसांच्या ताब्यात होते. बोठे हॉटेलचा आश्रय घेत होता. पाच हॉटेल त्याने बदलले होते. शुक्रवारी रात्री त्याने मुंबई हायवेवरील एका हॉटेलवर आश्रय घेतला. त्याठिकाणी त्याने बनावट आधार कार्ड दाखविले. 109 नंबरची रुम बुक केली. पोलिसांनी शनिवारी पहाटे त्या रुममध्ये धडक मारली. त्या ठिकाणी लपून बसलेल्या बोठेच्या मुसक्या आवळल्या आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दोन तासांनी जाणार होता भोपाळला

तीन वेळा चकवा देणारा बोठेला पोलीस मागावर असल्याचे कळल्याने तो भोपाळला पळून जाणार होता. पुढच्या दोन तासात तो हैदराबाद सोडणार होता. तोच पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचले आणि बोठेचे पुढचे नियोजन फसले. बोठेने हैदराबाद सोडले असते तर तो सापडणे अवघड झाले असते.

बोठेकडे होता पोलिसांचा डाटा

बोठेने हैदराबाद गाठल्यानंतर त्याला चांगल्या ठिकाणी आश्रय मिळाला. कायम गुन्हेगारांना आश्रय देणारा वकील त्याला मिळाला. मोबाईल, संगणक याशिवाय तांत्रिक साधने त्याला उपलब्ध करून देण्यात आली होती. या सर्वांचा उपयोग तो पोलीस यंत्रणावर मदत ठेवण्यासाठी करत होता. पोलिसांच्या हालचालीवर त्याची बारीक नजर होती. बोठेने जिल्हा पोलीस दलातील महत्वाच्या अधिकारी, कर्मचार्यांचे फोटो, नावे आदी माहिती गोळा केली होती. बोठेला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकातील अधिकारी व कर्मचार्यांना त्याने तत्काळ ओळखले. त्याच्या या सर्व गोष्टींवर असे लक्षात येते की तो पोलिसांच्या एक पाऊल पुढे होता.

कॉफी, जेवण आणि बरच काही

बोठे याला आश्रय देणारा वकील जनार्दन अकुले चंद्रप्पा हा बोठेला सर्व गोष्टी पुरवत होता. सकाळी कॉफी, दुपारी, संध्याकाळी जेवण याशिवाय तांत्रिक साधनं तो देत होता. यासाठी महिन्याला काही पैसे देण्याचे ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले. बोठे याने हैदराबादमध्ये वास्तव केले. त्यावेळी त्याच्याकडे दोन लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.