रेखा जरे हत्याकांड : 730 पानी दोषारोपपत्र दाखल

 रेखा जरे हत्याकांड  : 730 पानी दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपीविरोधात शुक्रवारी पारनेर न्यायालयात

दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 730 पानाचे दोषारोपपत्र असून भादवि 299 कलमान्वये मुख्य आरोपी बाळ बोठे पसार असल्याचा त्यात समावेश करण्यात आला आहे. बोठे याला अटक झाल्यानंतर भादवि कलम 173 (8) अन्वये त्याच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे (रा. शास्त्रीनगर, केडगाव), ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार (रा. प्रवरानगर ता. राहाता), फिरोज राजू शेख (रा. संक्रापूर आंबी ता. राहुरी), ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (रा. कडीत फत्याबाद, ता. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (रा. तिसगाव फाटा कोल्हार ता. राहाता) या पाच आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांडाला तीन महिने पूर्ण होत आहे.

यातील मुख्य सूत्रधार बोठे हा अद्यापही पसार आहे. हत्याकांडानंतर बोठे मुख्य आरोपी असल्याचे पोलीस तपासात समोर आले. सागर भिंगारदिवे मार्फत त्याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच संशयित मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घोषीत केले, तेव्हापासून बोठे हा पसार आहे. बोठे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालय व त्यानंतर औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळून लावला आहे. तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध पारनेर न्यायालयाकडून स्टॅडिंग वॉरंट मंजूर करून घेतलेले आहे. या वॉरंटला बोठे याच्याकडून जिल्हा जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने बोठे राचा अर्ज फेटाळला आहे.

...........

काय आहे दोषारोपपत्रात

एकुण 730 पानाचे हे दोषारोपपत्र असून त्यामध्ये सर्व घटनाक्रमाचा उल्लेख केला गेला आहे. 90 लोकांचे जबाब नोंदविण्यात आले असून 3 प्रत्यक्षदर्शी साक्षिदार तपासले गेल्याचा यात उल्लेख आहे. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, बोठे याचा घेतलेला शोधाची माहिती, तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले कागदपत्रे, साहित्य आदींचा यात उल्लेख करण्यात आला आहे. सध्या 730 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी बोठे याला अटक करण्यात आल्यानंतर भादवि 173 (8) अन्वये पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे.

.....................

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com