राहुरी विद्यापीठाच्या कांदा बियाण्यासाठीची नोंदणी लांबणीवर

राहुरी विद्यापीठाच्या कांदा बियाण्यासाठीची नोंदणी 
लांबणीवर

राहुरी (तालुका प्रतिनिधी) - एकाच दिवशी एकाचवेळी संगणकावर अनेक शेतकर्‍यांनी राहुरी विद्यापीठाच्या कांदा बियाण्यांसाठी ऑनलाईन नोंदणीचा प्रयत्न केल्यामुळे संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली व नोंदणी प्रक्रिया बंद पडली.

त्यामुळे बियाणे मागणीची प्रक्रिया दि. 14 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा राबविण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर आधारकार्ड आणि सातबारा उतारा अपलोड करुन आपली बियाणांची नोंदणी प्रक्रिया राबवावी, असे आवाहन बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी केले आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांची विद्यापीठ प्रक्षेत्रावर गर्दी होऊ नये म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले अ‍ॅग्रोमार्ट या ऑनलाईन प्रणालीद्वारे शेतकर्‍यांचे कांदा पिकाच्या फुले समर्थ व बसवंत 780 या वाणांच्या मागणीच्या नोंदणी घेण्यासाठी दि.11 जून रोजी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. परंतु अनेक शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणीचा प्रयत्न केल्याने संगणक प्रणालीत मोठी अडचण निर्माण झाली. पर्यायाने दि. 11 जून रोजी होणारी ऑनलाईन नोंदणी आता सोमवार दि. 14 जून रोजी होणार आहे.

दरम्यान, मागील वर्षीही करोना महामारीमुळे कांदा बियाण्यांची नोंदणी ऑनलाईन करण्यात आली होती. यावर्षीही करोना महामारीमुळे ऑनलाईन नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. मागील वर्षी अनेक शेतकर्‍यांना बियाण्यांच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे बियाणे मिळाले नव्हते, त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची निराशा झाली. मात्र, आता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बिजोत्पादनात वाढ करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com