प्रादेशिक सहसंचालकांनी दिले ‘अशोक’च्या चौकशीचे आदेश

शेतकरी संघटनेचे ताके यांनी केली होती तक्रार
प्रादेशिक सहसंचालकांनी दिले ‘अशोक’च्या चौकशीचे आदेश

श्रीरामपुर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्यात विविध बाबतीत तफावत आढळल्याच्या तक्रारीवरून प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी

सहकारी संस्थांचे प्रथम विशेष लेखापरीक्षक यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी सांगितले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे आपण स्वतः व रामचंद्र पटारे, भारत आसने, संदीप आदिक, दत्तात्रय लिप्टे, राजेंद्र भांड आदींनी प्रादेशिक साखर संचालक यांचेकडे विविध मुद्यांवरून तक्रार केली होती. त्यामध्ये सहविजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीचा उत्पादन खर्च व सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू झाल्यानंतरचा उत्पादन खर्च यात मोठी तफावत आढळली.

गेल्या 6 वर्षांत साधारण 38 ते 39 कोटी अतिरिक्त खर्च झालेला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प केल्यानंतर त्या प्रकल्पाने केलेली स्टीम विकत घेतलेली आहे ती किती असावी, त्याचे प्रमाण किती याचा कुठलाही ताळमेळ लागत नाही. सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू होण्यापूर्वी 5 वर्षे अशोकचा साखर उत्पादन विभाग सातत्याने नफ्यात होता परंतु त्यांनतर 2015-16 च्या आर्थिक वर्षाचा अपवाद वगळता सातत्याने तोट्यात आहे.

गेल्या दहा वर्षांचा पॅकिंग खर्च तसेच प्लास्टिक गोणी किंमत याचा अभ्यास केला तर साधारण 10 कोटी अतिरिक्त खर्च संशयास्पद आहे, त्याचप्रमाणे ज्या साखर कारखान्याकडे सहविजनिर्मिती प्रकल्प आहे, असे कारखाने भुस्सा बेल करत नाहीत. तर तो भुस्सा नियमित वापरत असतात त्याचा वापर बॉयलरचे इंधन म्हणून असतो.

यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त झालेला खर्च बोगस आहे. याशिवाय मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात पुढील वर्षात बदल करणे, अनाकलनीय खर्च दाखवणे वगैरे प्रकार केलेले आहेत. तरी संचालक मंडळ, काही अधिकारी तसेच लेखापरीक्षक यांचे विरोधात साखर सहसंचालक यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आलेली होती.

या तक्रारीची दखल घेऊन प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दि. 14 सप्टेंबर रोजी सहकारी वीजबील, स्टीम खर्च, भुशाचे बेलिंग, साखर पॅकिंग या मुद्यांची चौकशी करून सहकारी संस्थांचे प्रथम विशेष लेखापरीक्षक यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com