एमआयडीसीत सापडलेल्या रक्तचंदनाचे गौडबंगाल कायम

अटक आरोपींचे पसार आरोपीकडे बोट
एमआयडीसीत सापडलेल्या रक्तचंदनाचे गौडबंगाल कायम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील एमआयडीसी परिसरातील एका गोडावूनमध्ये छापा टाकून जप्त करण्यात आलेल्या तीन कोटी 83 लाख रुपयांच्या रक्तचंदनप्रकरणी पोलिसांच्या हाती अद्याप ठोस धागेदोरे लागले नसून रक्तचंदन कुठून आले याबाबत तपास सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून त्यांनी लक्ष्मण गणपत शिर्के (कर्जुले हर्या, ता. पारनेर) याचे नाव पुढे केले आहे. तो पोलिसांना सापडलेला नाही.

एमआयडीसी परिसरात एका गोदामात साठवलेले साडेसात टन रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत गोडावून मालक सदाशिव सिताराम झावरे (रा. वडगाव गुप्ता ता. नगर), विठ्ठल बबन झावरे (वय 34 रा. वासुंदे, ता. पारनेर), संतोष साहेबराव माने (वय 35 रा. सावरगाव फाटा, ता. पारनेर) व सागर गोविंद मुळे (वय 38 रा. जांबुत ता. शिरूर, जि. पुणे) यांना अटक केली आहे. लक्ष्मण शिर्के पसार आहे. दरम्यान अटक आरोपींकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.

त्यांनी रक्तचंदन साठ्यात आपली काही भूमिका नसून आपण फक्त राखणदारीचे काम केले असल्याचे ते पोलिसांना सांगत आहेत. लक्ष्मण शिर्के यानेच हा साठा येथे ठेवल्याने तोच यामागे असल्याचे आरोपींकडून पोलिसांना सांगितले जात आहे. यामुळे सदरचे रक्तचंदन एमआयडीसी परिसरात कुठून आले याचा ठावठिकाणा पोलिसांना सापडलेला नाही. शिर्केला अटक केल्यानंतर यामागचे गौडबंगाल समोर येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com