अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोनाचे लसीकरण सुरू होऊन 13 दिवस झाले आहे. या कालावधीत सुमारे साडेनऊ हजार आरोग्य कर्मचार्यांना करोना प्रतिबंधक लस देण्यात

आली आहे. सध्या एकूण 24 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यासाठी आणखी 31 हजार डोस प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.

राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली असून जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 39 हजार लसीकरणाचे डोस प्राप्त झाले होते. प्रारंभी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांना ही लस देण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात खासगी व शासकीय असे एकूण सुमारे 32 हजार कर्मचारी आहेत. 16 जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला असून जिल्ह्यात प्रारंभी 13 केंद्रावर लसीकरण सुरू होते. हळूहळू त्यात वाढ करत सध्या 24 केंद्रांवर लस दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 32 हजार खासगी व शासकीय आरोग्य कर्मचाजयांचे लसीकरण होणार असून 14 फेब्रुवारीपर्यंत हे लसीकरण पूर्ण करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुन्हा त्याच कर्मचार्यांना 15 फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. सध्या मंगळवार वगळता सर्व दिवशी लसीकरण केले जात आहे. नगर जिल्ह्यासाठी करोना लसीचे 39 हजार डोस 14 जानेवारीला प्राप्त झाले होते. त्यानंतर 22 जानेवारीला आणखी 31 हजार डोस आले. असे एकूण 70 हजार डोस आतापर्यंत जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.

लसीकरण केंद्र - 24

आतापर्यंत दिलेले डोस - 9 हजार 650