रावसाहेब, प्रवरा पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांसह 
जिल्हा उपनिबंधकांविरोधात गुन्हा
सार्वमत

रावसाहेब, प्रवरा पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांसह जिल्हा उपनिबंधकांविरोधात गुन्हा

न्यायालयाच्या आदेशानंतर 30 जणांविरोधात गुन्हा दाखल

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या संचालकांनी ठेवींची मुदत संपल्यानंतर देखील हेलपाटे मारायला लावले. त्यानंतर ‘रावसाहेब’चे प्रवरा पतसंस्थेत विलीनीकरण झाल्यानंतर प्रवरेच्या संचालकांनी खेळवले. यामुळे मुदत संपलेल्या ठेवीदारांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

या गुन्ह्यात मूळच्या रावसाहेब आणि विलीनीकरणानंतरच्या प्रवरा पतसंस्थेच्या संचालक मंडळांसह, जिल्हा उपनिबंधक, तालुका निबंधक, पतसंस्थेचा प्राधिकृत अधिकारी, शाखाधिकारी अशा तब्बल 30 जणांचा आरोपींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ठेवीदार इस्माईल गुलाब शेख (वय- 71 रा. तारकपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

नगर शहरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेत लघु, मध्यम व दीर्घ मुदतीत पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास व्याजासह चांगला परताव मिळेल असे प्रलोभन तत्कालीन संचालक मंडळाने दाखवत मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्या. यात फिर्यादी शेख यांनी पतसंस्थेत 54 हजार 657 रूपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. मात्र, मुदत संपून देखील फिर्यादी शेख यांना ठेवीची रक्कम व्याजासह देण्यात पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाने टाळाटाळ केली.

याप्रकरणी शेख यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. परंतू, संबंधितांविरूद्ध कोणतीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, तालुका उपनिबंधक यांनी केले. यामुळे शेख यांनी जिल्हा न्यायालयात रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था तथा प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. यावर न्यायालयाने फिर्यादीच्या मागणीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधीत पोलीस ठाण्याला दिले. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रावसाहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक रत्नाकर पंढरीनाथ बडाख, अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, संचालक शेख नसीर अब्दुला, संतोषकुमार संभाजीराव कदम, लक्ष्मण सखाराम जाधव, भास्कर सिताराम पवार, शरद शंकरराव धोंडे, शकुंतला भाऊसाहेब चौधरी, आशा हरीष भिंगारदिवे, प्रकाश नथ्थू सोनवणे, संजय गंगाधर मंचरे, संजवनी संभाजीराव पानसंबळ तसेच, प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झुंबरलाल कुंकूलोळ, संचालक राजेश शिवलाल भनसाळी, दिपक शिवराम पटारे, रामसुख दामोधर मंत्री, प्रकाश शिवमुर्ती हापसे, संदीप अच्चुतराव चव्हाण, आप्पासाहेब दशरथा सालापुरे, उषा दिगंबर केदारी, शितल चेतन भुताडा, रूपाली निखिल वारे, मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर, भाऊसाहेब नानाभाऊ सरोदे, जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी जिल्हा सहकारी संस्था, नगर तालुका उपनिबंधक यांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

सहकार खात्याचे अधिकारी गोत्यात

ठेवीदार शेख यांनी खासगी फिर्यादीत तत्कालीन जिल्हा उपनिबंधक, नगर तालुका निबंधक यांचे नाव आरोपींमध्ये टाकले आहे. त्यांच्याकडे न्याय मागवूनही त्यांनी न्याय दिला नाही. उलट संचालक मंडळाला पाठीशी घातले, म्हणून या दोघांच्या नावाचा सहआरोपी म्हणून फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com