संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

राज्यावर मोठे संकट असतांना देखील राज्याचे पालकत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य, शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले.

लोक हितार्थ अनेक योजना राबविल्या. तेव्हा सर्वसामान्य माणूस शिवसेनेबरोबर असेल. तेव्हा शिवसैनिकांनी सर्वच्या सर्व ग्रामपंचायत निवडणुका लढवाव्यात. जिथे शक्य तिथे महाविकास आघाडी सोबत लढावे, जिथं शक्य नाही तिथं स्वबळावर लढावे, आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले.

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असून संगमनेर तालुक्यात देखील तब्बल 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या 94 पैकी काही गावं हे अकोले विधानसभा तर काही गावं शिर्डी विधानसभेत जोडली गेली आहेत. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शाखाप्रमुख, गणप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संगमनेरात पार पडली. या बैठकीत खेवरे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते.

जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, एकीकडे करोनाचे भीषण संकट तर दुसरीकडे विविध नैसर्गिक आपत्ती राज्यावर येऊन देखील चांगल्या पद्धतीने राज्याचे पालकत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी, कामगारांच्या हिताचे निर्णय घेत कृषी कर्जमाफीसह लोकहितार्थ अनेक योजना आणल्या. तेव्हा सामन्य नागरिक, शेतकरी व ग्रामस्थ हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या सोबत असतील तेव्हा शिवसैनिकांनी सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीत निवडणूका लढवाव्या. व जिथे शक्य तिथे महाविकास आघाडी सोबत लढावे जिथं शक्य नाही तिथं स्वबळावर लढावे, आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

खासदार लोखंडे व जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोअर कमिटी बनविण्यात आली. त्यामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, बाबासाहेब कुटे, गुलाब भोसले, भाऊसाहेब हासे, अशोक सातपुते, शरद थोरात, अमोल कवडे, शीतलताई हासे, रामभाऊ रहाणे यांचा समावेश आहे. ही समिती उमेदवारांना सहाय्य व मार्गदर्शन करेल तसेच निवडणुकीत समन्वय साधण्याचे काम करेल. ज्येष्ठ नेते साहेबराव नवले यांच्या सहकार्याने ही समिती काम करेल.

या बैठकीस उपशहरप्रमुख पप्पू कानकाटे, भीमा पावसे, ज्ञानेश्वर कांदळकर, संदीप रहाणे, राजू सातपुते, घोडके ताई, अल्पना तांबे, भारत शिंदे, संतोष कुटे, योगेश खेमनर, जना नागरे, बाळासाहेब कवडे, लखन घोरपडे, दीपक साळुंके, पुलटे, अमोल डुकरे, संभव लोढा जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अमर कतारी यांनी केले. सूत्रसंचालन प्रथमेश बेल्हेकर यांनी केले तर आभार जनार्दन आहेर यांनी मानले.