तर आमदार काळेंना आज लोटांगण घालण्याची वेळ आली नसती - रवींद्र पाठक

रवींद्र पाठक
रवींद्र पाठक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांत आ. आशुतोष काळे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते तर आज राज्यातील सरकार बदलल्यानंतर आ. काळे यांना सरकारसमोर लोटांगण घालण्याची वेळ आली नसती, असा टोला माजी गटनेते रवींद्र पाठक यांनी आ. काळे यांना लगावला आहे.

आ. काळे यांनी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येसगाव येथील 5 नंबरचा साठवण तलाव पूर्ण करून कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मागील तीन वर्षांत त्यांनी पाणी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी काहीही केलेले नाही. शहराचा पाणीप्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आ. काळे यांच्या नाकर्तेपणामुळे कोपरगाव शहर व तालुक्याचा विकास खुंटला असून, जनतेला पाणी, रस्ते, सिंचन, आरोग्य व इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही आ. काळे हे जनतेला केवळ विकासकामाचे गाजर दाखविण्यात धन्यता मानत आहेत.

शहरातील नागरिक आजही पाण्यासाठी झगडत असताना ते शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला, असा चुकीचा प्रचार करत आहेत. गेली अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना आ. काळे यांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आणण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. आमदार म्हणून निवडून आल्या-आल्या त्यांनी जर शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना आणि येसगाव येथील 5 नंबरचा साठवण तलावाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असते तर ही योजना मागील अडीच वर्षांतच पूर्ण झाली असती, पण आ. काळे यांनी तसे जाणीवपूर्वक केले नाही.

कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही योजना रखडवण्याचे पाप त्यांनी केले आहे, असा आरोप रवींद्र पाठक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील 5 नंबर साठवण तलावासाठी आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेसाठी 131 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करवून आणल्याचे आ. आशुतोष काळे सांगत आहेत, परंतु 5 नंबर साठवण तलावाचे काम अजूनही प्रत्यक्षात सुरू झालेले नसताना ते चुकीची माहिती जनतेत पसरवत आहेत. आ. काळे यांनी गेल्या अडीच-तीन वर्षांत कोपरगाव मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी तसेच विकासासाठी काहीच केले नाही.

उलट भाजपच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करवून आणलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आ. काळे यांनी करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. कोपरगाव बसस्थानक, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, नगरपालिका वाचनालयाच्या नवीन इमारतीसाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला.

त्यातूनच या शासकीय इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये आ. काळे यांचे काहीच कर्तृत्व नाही. मात्र, बोलघेवड्या आमदारांना याचे काहीच वाटत नाही. प्रत्यक्ष काम न करता खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा आणि प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप ते करीत आहेत, अशी टीका पाठक यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com