रेशनवर 2 किलो डाळ मोफत व साखर मिळणार

श्रीरामपुरात वाटपास सुरूवात, रेशनधारकांना दिलासा
रेशनवर 2 किलो डाळ मोफत व साखर मिळणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत दिवाळीसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत मिळणारी चणा डाळ आणि साखर मोफत

उपलब्ध झाल्याने रेशनधारकांना दिलासा मिळाला आहे. डिसेंबरच्या नियमित धान्यासोबत दोन महिन्यांची डाळ आणि साखर मिळणार आहे.

करोनाचे संकट सुरू असल्याने सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पात्र रेशनकार्ड धारकांना नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर संबंधित कार्ड धारकाला 1 किलो चणा डाळ प्रति कार्ड मोफत देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. दिवाळी निमित्ताने 20 रूपये किलो साखर प्रतिकार्ड देण्यात येणार आहे.

पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची डाळ त्या त्या महिन्यात उपलब्ध झाली नाही. आता सरकारने ही डाळ आणि साखर उपलब्ध करून दिली असून याचे श्रीरामपूरसह जिल्ह्यात वाटप सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात 110 रेशन दुकाने आहेत. आता काही दुकानदारांनी या वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. उशीरा का होईना डाळ आणि साखर उपलब्ध होऊ लागल्याने रेशनधारकांना हायसे वाटले आहे.

मोफत तांदूळ बंद

करोनाचे संकट असल्याने केंद्र सरकारने पाच किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी हे तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत उपलब्ध झाल्याने रेशनधारकांना मोठा आधार मिळाला होता. पण आता करोनाचे संकट कमी झाल्याने आणि जनजीवन सुरळीत होऊ लागल्याने हे मोफत धान्य उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com