निळवंडेच्या पाण्यासाठी रांजणगावात रास्ता रोको आंदोलन

तहसिलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
निळवंडेच्या पाण्यासाठी रांजणगावात रास्ता रोको आंदोलन

रांजणगाव देशमुख | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आज (सोमवार) कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरण्यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसिलदार संदिपकुमार भोसले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

रांजणगाव देशमुख परिसर पर्जन्य छायेखाली येतो. याही वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे भीषण संकट ओढावले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दीड तास चाललेल्या आंदोलनामुळे कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी शिर्डी पोलिस निरिक्षक गुलावराव पाटील, पोलिस उप- निरिक्षक संभाजी पाटील व संदिप काळे यांच्यासह ३५ पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता. तसेच निळवंडे (उर्ध्व प्रवरा- २) जलसंपदा कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, निखिल अदिक, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी उपस्थित होते.

निळवंडे कालव्यातुन एस्केपद्वारे परिसरातील बंधारे भरुन द्यावे, खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान ग्रहीत धरुन सरसकट भरपाई मिळावी, जनावरांसाठी चारा डेपो सुरु करावे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यात यावे, दुष्काळी परिस्थीती लक्षात घेता विद्यार्थ्यांना शालेय फी माफ करावी, दुबार पेरणीसाठी शेतक-यांना अनुदान मिळावे, मागील २०२१-२२ सालचे गारपीट व अतिवृष्टी चे अनुदान त्वरीत वितरीत करण्यात यावे, रोहयो अंतर्गत सर्वांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, निळवंडे धरणाच्या अपुर्ण असलेले पाटाचे व वितरीकांचे काम तात्काळ चालु करावे, रांजणगाव देशमुख येथे स्वतंत्र महसुली मंडळ स्थापन करावे, उजनी उपसा सिंचन योजना तात्काळ चालु करुन पाझर तलाव भरण्यात यावे या मागण्यांसाठी हे रास्ता रोको अंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर उत्तर देताना कोपरगावचे तहसिलदार संदिपकुमार भोसले म्हणाले की, कमी पर्जन्यामुळे सर्वत्र भीषण टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन म्हणून ज्या काही उपाय योजना कराव्या लागतील त्या केल्या जातील. मागील वर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान राहिलेल्या शेतकऱ्यांना येत्या आठवडाभरात मिळून जाईल. दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले.

रास्ता रोकोवेळी दादाभाऊ वर्पे, गजानन मते, सुखलाल गांगवे, कैलास गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, उत्तमराव घोरपडे, संदिप रणधीर, नानासाहेब शेळके, ज्ञानेश्वर वर्पे, धीरज देशमुख आदींची यावेळी भाषणे झाली. आंदोलनासाठी अरविंद वर्पे, संतोष वर्पे, रवींद्र वर्पे, बाळासाहेब गोर्डे, त्र्यंबक वर्पे, महेश देशमुख, सचिन खालकर, अनिल गव्हाणे, सुभान सय्यद, आत्याभाऊ वर्पे , शहाजी वर्पे, गोरख वर्पे, अरुण वर्पे, जिज्याबापू गव्हाणे, शैलेश खालकर, बबन वामन, अभिलाष खालकर, अंबादास वर्पे, रामनाथ वामन, दत्तात्रय देशमुख, विरेंद्र वर्पे, बाबुराव थोरात, कारभारी खालकर, दशरथ खालकर, पोलीस पाटील राजेंद्र शेटे आदीसह परिसरातील लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वेक्षणाच्या अनुषंगाने ओढ्यांवर एस्कॅप काढले जातील. निळवंडे कालव्यांना पाणी सोडण्याचे नियोजन आहे.जेथे शक्य आहे तिथे पाणी सोडता येईल. मागील वेळी पण काही ठिकाणी पाणी सोडले होते

विवेक लव्हाट, उपकार्यकारी अभियंता, निळवंडे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com