राशीन येथे भिंतीला भगदाड पाडून चोरी

राशीन येथे भिंतीला भगदाड पाडून चोरी

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत चोरी केल्याची घटना कर्जत तालुक्यातील राशीन येथे घडली आहे.

बुधवारी रात्री चोरट्यांनी हा नवा पराक्रम केला आहे. याप्रकरणी राशीन पोलीस दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशीन- भांबोरा मार्गावर चैतन्य देविदास सायकर यांचे सावतामाळी किराणा अँड बेकर्स हे दुकान आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस गज, हातोडा अशा लोखंडी साधनांचा वापर करून दुकानाच्या भिंतीला एक ते दीड फूट व्यासाचे भगदाड पाडले. बांधकाम करण्यासाठी आणलेल्या विटांच्या ढिगावर बसून चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडले व दुकानात प्रवेश करत हात साफ केला.

चोरट्यांनी 10 हजार रुपयांची रोकड व सिगारेटचे बॉक्स चोरून नेले. सकाळी सायकर हे दुकान उघडून आत गेल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती दिल्यानंतर राशीन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

4 दिवसांपूर्वीच राशीन येथील मेडिकल दुकान, जिल्हा परिषद शाळा फोडून चोरट्यांनी रोकड व ऐवज लंपास केला होता. वारंवार होत असलेल्या चोर्‍यांमुळे नागरिक भयभीत झालेले असून पोलिसांच्या कामगिरीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com