‘रॅपिड चाचणी’ मुळे श्रीरामपूरकरांना दिलासा
सार्वमत

‘रॅपिड चाचणी’ मुळे श्रीरामपूरकरांना दिलासा

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrigonda

श्रीरामपुरात दिवसेंदिवस वाढती करोना संख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून जास्तीत जास्त स्राव तपासणे गरजेचे आहे. स्राव घेण्याची सोय श्रीरामपुरात करण्यात आली असली तरी ते तपासायला नगरला पाठवावे लागतात. तेथेही गर्दी पाहता अहवाल यायला विलंब होतो. त्यामुळे आता श्रीरामपुरात रॅपिड चाचणी प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे.

श्रीरामपुरातील एका रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या कुटुंबातील काही लोकांचे स्त्राव घेण्यात आले होते.त्यावेळी ते निगेटीव्ह आले मात्र त्यांना पुन्हा काही दिवसांनी त्रास होऊ लागल्याने पुन्हां स्त्राव तपासण्यात आले तर चक्क पॉझिटिव्ह आल्याने निगेटिव्ह व्यक्तीमध्ये लक्षणे नंतर विकसीत होऊ शकतात व नंतर ते पुन्हा पॉझिटिव्ह येऊ शकतात हे पुढे आले आहे. त्यामुळे निगेटिव्ह अहवाल जरी आला तरी अशा लोकांनी काही दिवस घराबाहेर पडणे धोक्याचे ठरणार आहे.

30 जून रोजी श्रीरामपूर शहरातील एका अधिकार्‍याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या थेट संपर्कातील बारा लोकांचे स्त्राव तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. इतर सात लोकांचे स्त्राव निगटिव्ह आले होते. मात्र काही दिवसांनी यापैकी दोघांना त्रास जाणवू लागल्याने त्यांचे स्त्राव पुन्हा खाजगी प्रयोगशाळेत तपासण्यात आले.

7 जुलै रोजी ते पॉझिटिव्ह आले. तर पुन्हा दोघांना त्रास जाणवू लागल्याने त्यांचेही स्त्राव खाजगी प्रयोगशाळेत तपासण्यात आले तर त्यांचेही अहवाल 9 जुलै रोजी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये कधीकधी सुरुवातीला लक्षणे विकसीत होत नाहीत.

मात्र काही दिवसांनी ते विकसीत होऊन त्याला करोनाची बाधा होऊ शकते हे या दोन उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे.त्यामुळे ज्यांची सुरुवातीला करोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी त्यांनी अती उत्साहात घराबाहेर फिरू नये तर आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार स्वतः घरातच क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे.

सुरुवातीला जरी करोना चाचणी निगेटिव्ह आली तरी काही दिवसांनंतर अशा व्यक्तीमध्ये लक्षणे विकसीत होऊ शकतात.त्यामुळे करोना रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीची चाचणी जरी निगेटिव्ह आली तरी त्याने काळजी घेतली पाहिजे व किमान दहा दिवस विलगीत राहिले पाहिजे.त्यांनी इकडे तिकडे फिरू नये.

- डॉ. वसंतराव जमधडे, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com