फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कोळपेवाडी परीसरातील घटना : पाथर्डी तालुक्यातील आरोपी फरार

कोळपेवाडी (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी सुरेगाव येथील विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर दुचाकीवर बसवून एका फार्म हाऊसवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी अमोल अशोक निमसे यांच्याविरूध्द विरूध्द अत्याचार व अ‍ॅक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.
डॉ. प्रियंका रेड्डी घटनेच्या जखमा ताज्या असतानांच ही घटना घडल्यामुळे नागरीकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
शुक्रवारी सायंकाळी 4.40 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी गेले. बहुतांशी विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घेण्यासाठी येत असतात. अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला वडील नियमितपणे शाळेतून घेण्यासाठी येत असत. मात्र शुक्रवारी ते बाहेरगावी गेल्यामुळे त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना या विद्यार्थिनीस शाळेतून आणण्यास सांगितले. मात्र नातेवाईकांना शाळेत येण्यास थोडा उशीर झाला. सायंकाळी 5.15 मिनिटांनी ते शाळेत आले. त्यावेळी त्यांना सदर मुलगी विद्यालयात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मुलीच्या वर्गशिक्षकांशी संपर्क केला असता शाळा सुटून अर्धा तास झाला असून तुमची मुलगी शाळा सुटल्यानंतर ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी असेल असे सांगितले. परंतु मुलगी त्या ठिकाणी नव्हती. नातेवाईकाने मुलीच्या घरी चौकशी केली. मात्र ती घरी आली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शाळेत आले. त्यांनी शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने मुलीचे अपहरण झाले असल्याची शंका आल्यामुळे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
वर्गशिक्षकांनी वर्गातील मुलींकडून या मुलीबाबत माहिती घेतली असता ही मुलगी निळा शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या गाडीवर बसून गेल्याची माहिती समजली. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी शाळेचे विद्यार्थी व सदरची विद्यार्थिनी ज्या रस्त्याने घरी जाते त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलेे. यामध्ये कोळपेवाडी-सुरेगाव रस्त्यावरील हॉटेल आनंदचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मुलगी निळा शर्ट घातलेल्या आरोपीने त्याच्या मोटारसायकलवर पुढे बसवून घेवून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉ. बाळासाहेब जुंधारे व जगदाळे कलेक्शनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची गाडी मोतीनगर सुरेगावच्या दिशेने जातांना दिसून आली. त्यानंतर प्रमोद दंडवते यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी शिर्डी-लासलगाव रोडने शहाजापूरकडे जातांना दिसले. पोलिसांनी व शिक्षकांनी रात्रभर तपास करून देखील मुलगी मिळून आली नाही.
दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी मोतीनगर सुरेगाव येथे सदर मुलीच्या नातेवाईकाच्या घरी या मुलीला सोडून देण्यात आले. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेवून वैद्यकीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात गाठले. त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. शनिवारी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे मुलीच्या शोध घेण्यासाठी शहाजापूर शिवारात गेले असता त्यांना शिवाजी बोरसे यांच्या फार्म हाऊसवर हिरो होंडा कंपनीची गाडी (एम. एच. 41-3033) चावीसह मिळून आली. गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाची ओळख पटल्यानंतर त्यांनी आपली गाडी अमोल अशोक निमसे याला दिली असल्याचे सांगितले. एका महिलेने फार्म हाऊसवर शाळेचे दफ्तर आणि जेवणाचा डबा असून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आरोपी व मुलीला जातांना पाहिले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी पोलिसांना अत्याचार झाले असल्याचे पुरावे आढळून आले.
मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द भादवि कलम 376 (2), (के)(एल)(एन)363, 366, 366, (ए), 342, 326 बालकांचे लैगिक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 6, अ, अनुसुचित जाती जमाती कायदा कलम 3(1)(डब्ल्यू)3, (2), (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे. सदर आरोपी पाथर्डी तालुक्यातील असून या फार्म हाऊसवर राखणदार म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com