
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्यामुळे रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या सहा आरोपीविरूध्द आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात सुमारे 1500 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. ठेवीदारांचे पैसे परत न देणार्या पटवर्धन पतसंस्थेच्या संचालकांनी सामुहिक गैरव्यवहार केल्याचा दोष ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली.
तोफखाना पोलीस ठाण्यात रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, नगर तालुका उपनिबंधक यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठेविदार इस्माईल गुलाब शेख यांनी फिर्याद दिलेली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केलेली आहे. यामध्ये अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, प्रकाश नथ्थू सोनवणे, लक्ष्मण सखाराम जाधव, संतोषकुमार संभाजीराव कदम व सरव्यवस्थापक रत्नाकर पंढरीनाथ बडाख यांचा यामध्ये समावेश आहे. या सहा आरोपीविरूध्द सुमारे 1500 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
दोघांचा जामीन अर्ज नामंजूर
अटकेत असलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार आणि लक्ष्मण सखाराम जाधव या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केला असल्याची माहिती ठेविदारांचे वकिल अॅड. महेश आनंदास यांनी दिली. पवार आणि जाधव यांनी प्रथम जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अपिल केले होते. तेथे त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.