नवीन रस्ता खोदल्याने खड्ड्यातच ठिय्या!

दोषींवर कारवाई करण्याची माजी नगरसेवक निखिल वारेंची मागणी
नवीन रस्ता खोदल्याने खड्ड्यातच ठिय्या!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील पाईपलाईन हडकोमधील नवीन रस्ता म्हाडाच्या ठेकेदाराने फोडल्याने माजी नगरसेवक निखिल वारे संतप्त झाले. रस्त्याचे नुकसान करणार्‍यांवर व परवानगी देणार्‍या मनपा अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी त्यांनी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्यासह खड्ड्यामध्येच ठिय्या आंदोलन केले. नुकसान झालेल्या रस्त्याची ठेकेदाराकडून त्वरित दुरुस्ती करून घेऊ, असे आश्वासन महापालिका अधिकार्‍यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दाट लोकवस्ती असलेल्या पाईपलाईन हडकोमध्ये सुमारे 25 वर्षांनंतर चांगल्या दर्जाचा रस्ता तीन महिन्यांपूर्वी तयार झाला. त्यासाठी प्रभागातील नगरसेवकांनी पाठपुरावा करून आमदार निधीतून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. चांगला रस्ता तयार झाल्याने नागरीक समाधानी होते. याच परिसरात म्हाडाच्या नवीन इमारतींचे काम 3 वर्षांपासून सुरू आहे. रस्ता तयार होण्यापूर्वीच माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांच्यासह नागरिकांनी म्हाडाचे अधिकारी व ठेकेदाराची भेट घेऊन खोदाईची कामे करून घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी त्या वेळी दुर्लक्ष केले.

मात्र, काल (मंगळवारी) सायंकाळी ठेकेदाराने विजेच्या वायरसाठी जेसीबीने रस्ता खोदला. हे समाजताच वारे तेथे पोहोचले. रस्ता खोदलेला पाहून ते कमालीचे संतप्त झाले. खोदाईला पर्याय असतानाही रस्ता जेसीबीने खोदल्यामुळे ठेकेदाराच्या सुपरवायजला चांगलेच फैलावर घेतले. खोदाईला महापालिकेनेच परवानगी दिल्याचे समजल्यावर वारे व पवार यांनी खड्ड्यातच आंदोलन सुरू केले. या वेळी परिसरातील नागरिकांनीही त्यांना पाठिंबा दिला.

हे समजल्यावर महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे व पारखे तेथे पोहोचले. त्यांनी वारे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठेकेदार व परवानगी देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी वारे यांनी केली. नंतर इथापे यांनी ठेकेदाराशी संपर्क साधला. नुकसान झालेला रस्ता ठेकेदाराकडून त्वरित योग्यरित्या दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. म्हाडाच्या बांधकामात घरांची ड्रेनेजलाईन बंद केली होती. ती लाईनही दुरुस्त करून देण्याचे ठेकेदाराने मान्य केले.

विकासकामांच्या निधीसाठी मोठा पाठपुरावा करावा लागतो. मात्र, महापालिका प्रशासनाच्या समन्वयाअभावी नवीन रस्ते खोदले जाणार असतील तर विकासकामे करायची कशी?

- निखील वारे, माजी नगरसेवक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com