
लोणी |वार्ताहर| Loni
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे मामाने भाच्याकडे 50 लाखांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने भाच्याच्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी मामा व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत लोणी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, चित्राल थिएटर (लोणी बु) जवळ राहणारा अक्षय बनसोड याने त्याचा मामा उमेश नागरे (रा.सिंधुताईनगर,लोणी खुर्द) व त्याचे साथीदार अरुण चौधरी (लोणी बु) व भारत सोनवणे (बाभळेश्वर) यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, मी आईच्या बीपीच्या गोळ्या आणण्यासाठी प्रवरा हॉस्पिटल समोरील मेडिकल स्टोअरमध्ये 9 मार्च रोजी रात्री 9.30 च्या सुमारास गेलो असता पांढर्या रंगाचे कारमधून वरील तिघे जण आले व त्यांनी बळजबरीने मला कारमध्ये घालून हसनापूर-चंद्रापूर शिवारात नेऊन लाथा बुक्यांनी मारहाण केली.
तुझ्या आईकडून आम्हाला 50 लाख रुपये आणून दे, पैसे नसतील तर दुकानावर कर्ज काढ, नाही तर तुला व तुझ्या आईला जीवे मारू अशी धमकी दिली. लोणीचे स.पो.नि. युवराज आठरे यांनी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.