तहसीलदारांकडून खंडणी घेणार्‍यास पकडले

तहसीलदारांकडून खंडणी घेणार्‍यास पकडले

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून 30 हजार रुपये खंडणी स्विकारताना सामाजिक कार्यकर्ता म्हणवणार्‍या अरुण रोडेला पोलीस उपनिरीक्षक उगले यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तहसीलदार देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत तहसीलदार देवरे यांनी दिलेली माहिती अशी की, अन्याय निर्मूलन समितीचा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे तालुक्यातील नदीपात्रांमधील वाळू उपसा व तहसील कार्यालयातील इतर कामकाजाविषयी वारंवार तक्रारी करीत असे. या तक्रारींना माध्यमात प्रसिद्धी देऊन संबंधित बातम्या रात्री उशिरा तहसीलदार ज्योती देवरे यांच्या भ्रमणध्वनीवर पाठवत असे. हा प्रकार थांबविण्यासाठी देवरे यांच्याकडे पैशाची मागणी करीत असे.

रोडेने सुरूवातीला पन्नास हजार रुपये मागितले. तहसीलदार देवरे यांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्याने रोडेने तुम्हाला शक्य आहेत तेवढे पैसे द्या, अशी मागणी केली. तहसीलदार देवरे यांनी तशी तयारी दर्शवल्यावर रोडे आज पैसे नेण्यासाठी तहसील कार्यालयात आला होता. तहसीलदार देवरे यांनी दिलेले तीस हजार रुपये मोजत असतानाच पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचारी भालचंद्र दिवटे, गहिनीनाथ यादव यांनी रोडेला रंगेहाथ पकडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com