आमदारांनी रांजणगाव देशमुख पाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटू नये - गोर्डे

File Photo
File Photo

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व रहिवासीयांना 2024 सालापर्यंत पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजना कार्यान्वीत केली असून त्या अंतर्गतच तालुक्यातील राजंणगाव देशमुखसह अन्य सात गावच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी 35 कोटी 98 लाख रुपयांची तांत्रीक मान्यता दिली आहे. यात आमदार आशुतोष काळे यांचे योगदान नाही, अशा आशयाचे पत्रक प्रकाश गोर्डे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. निधी मोदींचा अन् डंका पवारांचा हे बरोबर नाही असेही ते म्हणाले.

गोर्डे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, आमदार आशुतोष काळे व त्यांच्या प्रसिध्दी यंत्रणेने या अगोदरही शिंगणापूर, कारवाडी, कुंभारी, कोळपेवाडी, कोळगावथडी, शहाजापूर, मढी बुद्रुक, हिंगणी, जेउरकुंभारी, देर्डे चांदवड, देर्डे कोर्‍हाळे, डाउच खुर्द यासह अन्य पिण्याच्या पाण्याच्या योजनांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जल जीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिलेला आहे, असे असतानाही आमदार आशुतोष काळे स्वतःच श्रेय लाटत असतील तर ते बरोबर नाही. रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठीही जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी मिळालेला आहे.

थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांनी मोदी व भाजपाचे आभार मानून थेट मोदींनी हा निधी उपलब्ध करून दिला असे म्हटले पाहिजे होते. याउलट माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या 1999 ते 2014 पर्यंतच्या 15 वर्षांच्या कालखंडात रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालवून त्यावर अवलंबून असलेल्या सात गावांची तहान भागविली आहे. सत्ता नसतानाही कोल्हे कुटुंबियांनी या भागातील रहिवासीयांना वार्‍यावर सोडलेले नाही. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी सातत्याने कारखान्याच्या विद्युत मोटारीसह आवश्यक ते मनुष्यबळ कर्मचारी वर्ग देऊन या योजनेतील सततच्या बिघाडाची दुरुस्ती करूनही पाणीपुरवठा योजना चालू ठेवली होती.

मतदार संघातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत संबंधित अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांच्याशी सतत स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी संपर्क साधून पाठपुरावा केलेला आहे. 2014 मध्ये स्नेहलता कोल्हे यांना या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनीही सदरची पाणीपुरवठा योजना चालवून दाखविली आहे. याशिवाय रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकल्यामुळे त्याचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याबाबत सौ. कोल्हे यांनी पीडी झालेले वीज कनेक्शन थेट तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून ही योजना पूर्ववत चालू केली होती. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले हा विरोधकांचा कांगावा अत्यंत खोटा आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या पाच वर्षांचा सत्तेचा अपवाद वगळता कोल्हे यांनीच रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरळीत चालवली आहे. त्याची प्रशासकीय मान्यता देखील भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे ह्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच मिळविणार आहेत, तेव्हा विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल करू नये, असेही प्रकाश गोर्डे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com