रांजणगाव औद्योगिक वसाहतीत बिस्कीटांचा अपहार

ब्रिटानीयाचे लाखो रुपयांचे 90 बॉक्स गायब
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत बिस्कीटांचा अपहार

शिरूर |प्रतिनिधी| Shirur

रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून गोदामात ठेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या लाखो रुपये किमतीच्या बिस्कीटांचा अपहार करण्यात आल्याची घटना घडली.याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रावण राजाराम मलगुंडे (22, रा. ढोकसांगवी ता. शिरूर, जि. पुणे), दीपक बाळासाहेब सिनलकर (21, रा. पानोली, ता. पारनेर जि. अहमदनगर) व संजय राजगुरू (रा. कवठे येमाई, ता. शिरुर),जि. पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव औद्योगिक वसाहत (ता. शिरुर) येथील लेटस ट्रान्सपोर्ट लिमिटेड या कंपनीतून ब्रिटानिया कंपनीचे बिस्कीट व इतर माल ट्रान्सपोर्ट केला जातो, श्रावण मलगुंडे यांच्या (एम एच 12 एस एक्स 4645) या टेम्पोमध्ये बिस्कीटांचा माल भरून सदर मालाचा टेम्पो 16 फेब्रुवारी रोजी टेम्पो चालक दीपक सिनलकर व संजय राजगुरु यांच्या मदतीने मुंबई येथील ब्रिटानिया गोडावून येथे देण्यासाठी पाठवण्यात आलेला होता.

मात्र त्यानंतर वेळ उलटून देखील सदर टेम्पो माल घेऊन मुंबई येथील गोडावून येथे पोहचला नाही. त्यामुळे कंपनीच्या बिस्किटांच्या मालाचा टेम्पो मालक व चालकांनी संगनमताने अपहार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर लेटस ट्रान्सपोर्ट लिमिटेड या कंपनीचे प्रमुख सिद्धेश्वर तागड यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com