रामवाडीच्या नागरिकांचे जीवन जगणे झाले असह्य

अस्वच्छता, दुर्गंधी, दूषित पाण्याने नागरिक हैराण
रामवाडीच्या नागरिकांचे जीवन जगणे झाले असह्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील रामवाडी भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. याठिकाणी त्वरीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन रामवाडी नागरी सुधारणा कृती समितीच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले.

रामवाडी झोपडपट्टीतील नागरिकांना लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेने वार्‍यावर सोडल्याचा आरोप करून येत्या 15 दिवसांत प्रश्न न सुटल्यास सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, सतीश साळवे, सतीश लोखंडे, संजय परदेशी, पिटर साळवे, संकेत लोखंडे, सुभाष वाघमारे, अमोल लोखंडे, दीपक साबळे आदी उपस्थित होते. शहरातील रामवाडी ही अत्यंत जुनी झोपडपट्टी असून याठिकाणी राहणार्‍या नागरिकांची चौथी पिढी वास्तव्यास आहे.

येथील नागरिकांना जीवन जगताना मिळणार्‍या नरक यातना काही कमी होत नाहीत. पंचवार्षिक निवडणुकीत येथून निवडून येणारे लोकप्रतिनिधी मोठमोठी आश्वासने देतात. मतांसाठी नागरिकांना सर्व नागरी सुविधा पुरवण्याचे गाजर दाखवितात. परंतु आजतागायत परिसरातील मूलभूत समस्या म्हणजे स्वच्छ पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, दिवाबत्तीची सोय, दैनंदिन अस्वच्छता यांसारख्या समस्या सुटलेल्या नाहीत. यासाठी येथील लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधी व महापालिकेने नागरी समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे या परिसरात कचरा साचून दुर्गंधी सुटणे, त्यातून डासांची पैदास होऊन रोगराई वाढणे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणे अशा गोष्टी नित्य नियमाच्या झालेल्या आहेत. या परिसरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी कुठलेही नियोजनपूर्वक काम होत नसल्याने, सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे सदरचे सांडपाणी वस्तीमधील रस्त्यावरून वाहत असते. त्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते. सांडपाण्याचे पाईप फुटल्याने नागरिकांना नळाद्वारे मैलामिश्रित पाणी येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे या परिसरात डेंग्यू, मलेरिया, कावीळ, चिकनगुन्या यांसारखे साथीचे आजार नागरिकांना सातत्याने होत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com