सात्रळ |वार्ताहर| Satral

राहुरी तालुक्यातील रामपूर ग्रामंचायतीच्या मुख्य जलवाहिनीला गेल्या तीस वर्षांपासून गावातील राहूल रावसाहेब साबळे यांनी अनधिकृतरित्या नळ घेऊन केलेला

पाणी वापर प्रशासनाच्या आदेशावरून खोदकाम केल्यानंतर चव्हाट्यावर आला आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला असून नळ कनेक्शन बंद करून संबंधितांवर पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामसभेत कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, सत्ता ताब्यात असल्यामुळे कारवाई होत नव्हती. अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत होते. परंतु ग्रामस्थ सौ. मनीषा विनोद मोरे, रावसाहेब पठारे, नितीन खळदकर, दत्तात्रय नालकर, सुनील पठारे, दिलीप खळदकर, बाळासाहेब नालकर, शिवाजी नालकर, अनिल पठारे, किशोर पठारे, रवी पठारे, गवजी लोखंडे, केशवराव लोखंडे, भास्कर नालकर, गोकुळ शिंदे, सतीश भोसले, इंद्रभान भोसले, राजू मोरे, यासह ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार राहुरी, पोलीस निरीक्षक, राहुरी यांना निवेदन देऊन हे अनधिकृत नळ कनेक्शन बंद करून पाणीचोरीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांना उपोषण थांबविण्याची विनंती करून प्रशासक भणगे व ग्रामसेवक श्रीमती भरसाकळ यांना त्या तक्रारींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार त्यांनी दि. 3 फेब्रुवारी 2021 रोजी खोदकाम करून ही पाणी चोरी उघड केली आहे. तसा पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. परंतु ग्रामस्थांनी आक्रमक होत पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तसेच अधिकारी टाळाटाळ करीत असल्यास वरिष्ठ पातळीवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता राहुल साबळे यांच्यावर काय करवाई होते? हे येत्या काही दिवसांत कळेलच! परंतु सत्ताधार्यांना चांगलाच दणका बसला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.

मागील तीस वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनीला चोरून नळ घेऊन पाणीचोरी सुरू होती. आता ही चोरी उघड झाली असून पाणीचोरीचा गुन्हा दाखल करून मागील तीस वर्षांची पाणीपट्टी दंड म्हणून वसूल करावी. अन्यथा आम्ही ग्रामस्थांसह पुन्हा उपोषणाला बसू.
- रावसाहेब पठारे, नेते जनसेवा मंडळ, रामपूर

तीस वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे. सत्ताधार्यांना वेगळा न्याय व सर्वसामान्यांना वेगळा न्याय, असे चालणार नाही. पुढील कारवाई लवकर करावी, अन्यथा पुन्हा उपोषण करू.
- मनीषा विनोद मोरे

मुख्य जलवाहिनीला चोरून कनेक्शन घेऊन पाणीचोरी सुरू होती. ती उघड झाली असून अधिकार्यांनी पंचनामा केला आहे. त्यावर पुढील कार्यवाही करावी, तसेच यापुढे कोणतेही बेकायदेशीर कामे करू देणार नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरूच राहील.
- नितीन खळदकर

राहुल साबळे यांच्या अनधिकृत नळ कनेक्शनबाबत ग्रामस्थांची तक्रार आली होती. त्याअनुषंगाने खोदकाम केले असून अनधिकृत नळ कनेक्शन सापडले आहे. तसा पंचनामा केला असून पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.
- भणगे, प्रशासक ग्रामपंचायत रामपूर

ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार राहुल साबळे यांच्या घराच्या मागील बाजूस खोदकाम केले असता अनधिकृत नळ कनेक्शन सापडले आहे. कनेक्शन बंद करून पंचनामा केला आहे. पुढील कायदेशीर कारवाई गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करू.
- श्रीमती बी. जे. भरसाकळ, ग्रामसेवक , ग्रा.पं.रामपूर