
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील निपाणी वडगाव येथील रमेश पवार खून प्रकरणातील पसार असलेला आरोपी अशोक साखर कारखान्याचा माजी अध्यक्ष सोपान राऊत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास अटक करण्यात आली. काल शनिवारी आरोपीस श्रीरामपूर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. के. खराडे यांच्यासमोर हजर केले असता दि. 16 ऑगस्टपर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोपान राऊत व सविता पवार या दोघांनी अजय गायकवाड व प्रसाद भवर यांना बरोबर घेऊन रमेश पवार यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. दि. 3 एप्रिल 2023 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास प्रसाद, अजय व मयत रमेश हे तिघे निपाणीवडगाव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या तळ्याजवळ गेले. येथे रमेशला दारू पाजली व प्रसाद, अजय याने त्याचा गळा दाबून खून केला. गावातील एक टेम्पो बोलावून त्यात रमेशचा मृतदेह ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आणून टाकला. काहीवेळाने या ठिकाणी मयत रमेशची पत्नी सविता पवार, बहिण शांताबाई वैद्य व एकजण आले.
त्यांनी रमेश यास उचलून घरी नेले. दुसर्या दिवशी सकाळी अंत्यविधीची तयारी केली. यावेळी शहर पोलिसांना निनावी फोन आला. त्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी जास्त दारू पिल्यामुळे रक्ताच्या उलट्या झाल्याचे पत्नी सविता हिने पोलिसांना सांगून शवविच्छेदनास विरोध केला. परंतु, पोलिसांनी मयत रमेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. गळा दाबून खून केल्याचा अहवाल दि. 11 एप्रिल रोजी प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी फिर्याद दिली.
दोन महिन्यानंतर मयताची पत्नी सविता, नंतर अजय गायकवाड याला अटक करण्यात आली. पोलिसांसमोर प्रसाद भवर याने साक्ष दिली होती. त्याला अशोकनगर परिसरात मारहाण करण्यात आली. त्यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, त्याने खोटी साक्ष दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यानच्याकाळात तपासी अधिकारी पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक निरीक्षक जीवन बोरसे, समाधान सुरवाडे यांनी या घटनेचा तपास करून खुनाचा उलगडा केला.घटनाकाळात राऊत व सविता यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फोन कॉल झाल्याचे तपासात समोर आले होते.
मयताची पत्नी सविता पवार, प्रसाद भवर, अजय गायकवाड व अशोक कारखान्याचा माजी अध्यक्ष सोपान राऊत या चार जणांविरुध्द कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून आरोपी सोपान राऊत पसार झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत याने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर दि. 26 जुलै रोजी सुनावणी होऊन उच्च न्यायलयाने नोटिसा बजावल्या. त्यात आठ दिवसाची मुदत दिली. त्यानुसार दि. 3 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र सरकारी वकिलांनी मुदत वाढीची मागणी केल्याने न्यायालयाने ती मान्य करुन दि. 10 ऑगस्ट रोजी त्यावर न्यायमूर्ती आर.एम. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी जामीन अर्ज मंजूर होऊ शकत नाही याची खात्री झाल्याने आरोपीच्यावतीने करण्यात आलेला जामीन अर्ज मागे घेण्यात आला. त्यानंतर पोलिसात हजर होण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी मध्यरात्री सोपान राऊत शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.