शिर्डीतूनच लोकसभा लढणार

भाजप पदाधिकार्‍यांशी आपली प्राथमिक चर्चा - आठवले
शिर्डीतूनच लोकसभा लढणार

पुणे |प्रतिनिधी| Pune

आगामी लोकसभा निवडणूक आपण शिर्डी मतदार संघातून लढणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. याबाबत भाजप पदाधिकार्‍यांशी आपली प्राथमिक चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. शिर्डी बरोबरच आणखी दोन लोकसभेच्या जागा आरपीआय लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील गोल्फ क्लब येथे शासकीय विश्रामगृहावर आठवले पत्रकार परिषदेत बोलत होते. आरपीआयमुळे भाजपला एकूणच संपूर्ण देशभरात फायदा झाल्याचे दिसते. यामुळे केंद्रात मंत्रिपदाप्रमाणे, राज्यातही विधानसभेवेळी 15 जागा व दोन मंत्रिपदे अन् एका महामंडळाची मागणी आपल्या पक्षाची असल्याचे, आठवले म्हणाले.

यावेळी ते म्हणाले, 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच सत्ता येईल. काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान कधी होऊ शकत नाही. विरोधक सर्वच पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा असल्याचे उपरोधात्मक टोलाही त्यांनी लगावला. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ पन्नास जागा देणार असल्याचे विधान केले होते.

यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता. यावर बोलताना आठवले म्हणाले, बावनकुळेंचे ते मत असू शकते. महायुतीत जागा वाटपाबाबत सर्वांशी चर्चा केली जाईल. यातून शिवसेनेची नाराजी दूर होईलच. आवश्यकता असल्यास यात आपण स्वत: पुढाकार घेऊ तिढा सोडवू, असेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com