सामाजिक सुख, शांती नांदावी !

दोन वर्षानंतर नमाज अदा
सामाजिक सुख, शांती नांदावी !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे दोन वर्षे वाया गेली. आता कुठे जनजीवन सुरळीत होत असून समाजात सुख आणि शांती नांदावी. सामाजिक, धार्मिक वातावरण शांत राहावे यासाठी नगरच्या ईदगाह मैदानावर ईद सणानिमित्त नमाज, खुदबा व त्यानंतर सुख, शांती, समृध्दीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी ईदची नमाज झाल्यानंतर शहरे खतीब मौलाना सईद अहमद खान यांनी उपस्थितीत समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी रमजानचा पवित्र महिना संपला आणि मुस्लिम बांधव उत्साहात रमजान ईद साजरी केली. करोनामुळे सलग दोन वर्ष मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानमध्ये ईदची सामुदायिक नमाज अदा केलेली नव्हती. मात्र, यंदा करोनाचा संसर्ग संपल्याने मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानमध्ये जावून ईदची सामुहिक नमाज अदा केली. यावेळी मोठी गर्दी निर्माण झाली होती.

सकाळी सातपासून शहरातील विविध मजिदमध्ये नमाज आणि प्रार्थना सुरू होती. ज्यांना ईदगाह मैदानावर उपस्थित राहणे शक्य नव्हते, त्यांनी मजिदमध्ये नमाज अदा केली. त्यानंतर 10 वाजता शहरातील कोठला येथील ईदगाह मैदानात खतीब मौलाना सईद अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभी धार्मिक व्याख्यान, ईदची नमाज, खुदबा व त्यानंतर सुख, शांती, समृध्दी आणि सामाजिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मौलाना खान यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुस्लिम समाज बांधवांनी कोणत्याही भडकावू वक्तव्याला बळी पडू नये.

भारतासह संपूर्ण मानव जातीचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. नमाज निमित्त प्रशासनाने नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुक वळवली होती. तसेच मोठ्या प्रमाणात यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेेंकाना शुभेच्छा दिल्या. दोनवर्षापासून करोनामुुळे मुस्लिम बांधवांना एकमेंकाच्या घरी जावून ईदच्या शुभेच्छा देता आल्या नव्हत्या. यंदा मात्र मोठ्या संख्येने समाज बांधवांनी एकमेंकाच्या घरी जावून शिरखूर्मा, इफ्तार पार्टीचा आनंद लुटला.

Related Stories

No stories found.