शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थानच्या (Sai Baba Trust) वतीने आयोजित केलेल्या रामनवमी उत्सवास (Ram Navami Festival) आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातुन पालख्यां सोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या (Sai Devotee) साईनामाच्या गजराने अवघी शिर्डी (Shirdi) दुमदुमुन गेली.
उत्सवाच्या पहील्या दिवशी पहाटे 5.15 वाजता काकड आरतीनंतर साईबाबांच्या फोटोची व साईसच्चरित ग्रंथाची व्दारकामाई (Vdarakamai) पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांनी पोथी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव (CEO Rahuri Jadhav) यांनी वीणा, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व प्र.प्रशासकीय अधिकारी संजय जोरी यांनी प्रतिमा घेवुन सहभागी झाले होते.
याप्रसंगी संस्थानच्या मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, मिनाक्षी सालीमठ, कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाईत गेल्यानंतर साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्ये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी व्दितीय अध्याय, मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे यांनी तृतीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांनी चौथा अध्याय व सामान्य प्रशासन प्र.अधिक्षक राजतिलक बागवे यांनी पाचवा अध्यायाचे वाचन केले.
सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांच्या पत्नी मिनाक्षी सालीमठ यांनी श्रींची विधीवत पाद्यपूजा केली. यावेळी प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व कावेरी जाधव, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती झाली. दुपारी 4 वा. समाधी मंदिराशेजारील स्टेजवर विक्रम नांदेडकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर सायंकाळी 6.30 वाजता श्रींची धुपारती झाली. त्यानंतर रात्रौ 7.15 ते 9.30 यावेळेत अलोक मिश्रा, दिल्ली यांचा भजन संध्या हा कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला.
संस्थानच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. रात्रौ. 9.15 वाजता श्रींची गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. आज उत्सवाचा प्रथम दिवस असल्याने व्दारकामाई मंदिर पारायणासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आले. संस्थान प्रशासनाने संभाव्य गर्दीचे नियोजन केलेले असल्यामुळे सर्व साईभक्तांना सुखकर व सुलभतेने बाबांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. उन्हाची तीव्रता लक्षात घेवून संस्थान प्रशासनाने दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे.
रामनवमी उत्सवाच्या प्रथम दिवशी साई सेवक मंडळ व साईलीला मंडळ, मुंबई या मानाच्या पालखींनी हजेरी लावली. तर उत्सवानिमित्त व्दारकामाई मंडळ, मुंबई यांच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर मंदिर प्रवेशव्दारावर श्रीराम, लेंडीबागेत साई पालखी मिरवणुक व साईप्रसादालयाच्या प्रवेशव्दारावर शिव भोला भंडारी साई भोला भंडारी हे भव्य देखावे उभारले आहे. याबरोबरच समाधी मंदिर व परिसरात अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती शोभा पै यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. उत्सवाच्या मुख्य दिवशी आज गुरुवारी पहाटे 5.15 वा. श्रींची काकड आरती, पहाटे 5.45 वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक होईल.
सकाळी 6.20 वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्नान व दर्शन. सकाळी 7 वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी 10 ते 12 यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्म किर्तन कार्यक्रम, दुपारी 12.30 वा. माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी 4 वा. निशाणांची मिरवणूक तर सायं. 5 वा. श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्यानंतर सायं. 6.30 वा. धुपारती होईल. रात्रौ 7.15 ते 9.15 यावेळेत मंगेश अमदुरकर, वर्धा यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार असून रात्रौ 9.15 वा. श्रींची गुरुवारची नित्याची पालखी मिरवणूक होईल. रात्रौ 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक 30 मार्च रोजीची नित्याची शेजारती व दिनांक 31 मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.