रामनवमी उत्सव अध्यक्ष निवडीचा निर्णय बैठकीत नाहीच

आपलाच अध्यक्ष असावा || दोन्ही गटांची ठाम भूमिका || आजच्या बैठकीकडे ग्रामस्थांचे लक्ष
रामनवमी उत्सव अध्यक्ष निवडीचा निर्णय बैठकीत नाहीच

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

रामनवमी उत्सव समितीच्या अध्यक्षपदाचा वाद मिटवण्याकरिता मंगळवारी शिर्डी येथे दोन्ही गटाच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीत दोन्ही गटाने आपलाच अध्यक्ष ठेवावा, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे अध्यक्ष निवडीवर कुठलाही निर्णय झाला नसून बुधवारी पुन्हा या विषयावर बैठक बोलावली असून अध्यक्ष निवडीबाबत काय निर्णय होणार याची उत्कंठा ग्रामस्थांना लागली आहे.

रविवारी रामनवमी उत्सव कमिटीच्या अध्यक्ष निवडीबाबत एका गटाने संजय शिंदे यांची निवड घोषित केली तर सोमवारी सकाळी दुसर्‍या गटाने दीपक वारुळे यांची निवड जाहीर केल्याने शिर्डीत प्रथमच रामनवमी उत्सवासाठी 24 तासांतच दोन गटाने दोन अध्यक्षांची निवड केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एका गटाने घेतलेल्या बैठकीत मागील उत्सवाचा हिशोब दिला नाही, नेतृत्व करणारे सर्वांना बरोबर घेत नाही, असे वेगवेगळे मुद्दे बैठकीत मांडले. तर दुसर्‍या गटाने मागील उत्सवाचा हिशोब दिला नाही याचे खंडन करत यावर्षी होणार्‍या उत्सवासाठी ओबीसी चेहर्‍याला संधी मिळावी यासाठी आग्रह धरला.

दोन गटाचे दोन अध्यक्ष निवड झाल्यामुळे शहरात धार्मिक कार्याला राजकीय वळण येऊ नये यासाठी मंगळवारी राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव सुधाकर शिंदे तसेच छत्रपती शासन व युवा ग्रामस्थ या पदाधिकार्‍यांनी दोन्ही गटाच्या पदाधिकार्‍यांची एकत्र बैठक घेऊन अध्यक्ष निवडीवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. परंतु मंगळवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष निवडीवर दोन्ही गट ठाम असल्यामुळे या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही. तसेच शिर्डीत होणार्‍या रामनवमी उत्सवासाठी साईबाबा संस्थानने निधी द्यावा याकरिता दोन्ही गटाने पत्र दिले असल्याचे समजते. कोणाला निधी द्यावा याबाबत संस्थान व ग्रामस्थ यांच्यात संभ्रम निर्माण झाला असून दोन्ही गटाने आपापसातील वाद मिटवून समंजसपणे यावर तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

बुधवारी पुन्हा उत्सव समितीच्या अध्यक्ष निवडीवर मार्ग काढण्याकरिता दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत कैलासबापू कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, विजय जगताप, ज्ञानेश्वर गोंदकर, सुधाकर शिंदे, प्रमोद गोंदकर, प्रताप जगताप, संदीप सोनवणे, ताराचंद कोते, सुजित गोंदकर, नितीन शेळके, सचिन शिंदे, दिगंबर कोते, राजेंद्र कोते, दादाभाऊ गोंदकर, संजय शिंदे, दीपक वारुळे, हिरामण वारुळे, सचिन कोते, राहुल गोंदकर, राजेंद्र शेळके, संदीप पारख, विक्रांत वाकचौरे, सोमनाथ महाले, कैलास आरणे यांच्यासह दोन्ही गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com