महंत रामगिरी महाराज
महंत रामगिरी महाराज
सार्वमत

पांडुरंगाच्या दर्शनाची तळमळ वारकर्‍यांच्या अंत:करणात - महंत रामगिरी महाराज

ठायीच बसावे करून एकचित्त। आवडी अनंत आळवावा॥ तो परमात्मा सर्वांच्या ह्दयात आहे, असा भाव ठेवून प्रत्येकाने पांडुरंगाचे भजन एकांतात करावे

Arvind Arkhade

महेंद्र जेजुरकर

अस्तगाव - पांडुरंग परमात्मा भक्तांसाठीच पंढरपुरात कमरेवरीत हात ठेवून उभा आहे, असा भाव वारकर्‍यांचा असतो. पांडुरंगाच्या दर्शनाची तळमळ वारकर्‍यांच्या अंत:करणात असते. करोनामुळे आपण घरीच राहावे, ठायीच बसावे करून एकचित्त। आवडी अनंत आळवावा॥ तो परमात्मा सर्वांच्या ह्दयात आहे, असा भाव ठेवून प्रत्येकाने पांडुरंगाचे भजन एकांतात करावे, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

आज आषाढी वारी असल्याने महंत रामगिरी महाराज यांनी ‘सार्वमत’शी संवाद साधला. करोनामुळे वारकर्‍यांना पंढरीला जाता येत नसल्याने आपण घरीच थांबून पांडुरंगाचे भजन करण्याचा सल्ला त्यांनी वारकरी, भक्तांना दिला. याविषयी अधिक बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, वारकरी सांप्रदायात पंढरीच्या वारीला खूप महत्त्व आहे. पंढरीची वारी आहे, माझे घरी। अनेक न करी तिर्थव्रत॥ इतर तिर्थयात्रेपेक्षा पंढरीच्या यात्रेला वारकर्‍यांनी विशेष महत्त्व दिलेले आहे. कारण पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. तो वाटपाहे उभा भेटीची आवडी। कृपाळू तातडी उताविळ॥ भगवंत भक्तांच्या भेटी करिता उताविळ झालेला असतो. हा भक्ताचा आणि भगवंताचा संबंध असतो.

वारकरीही त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी तळमळत असतो. आणि एक एक क्षण हा त्या वारकर्‍याचा महत्त्वाचा असतो. भेटी लागे पंढरीनाथा। जिवा लागली तळमळ व्यथा॥ पंढरीनाथाला, पांडुरंगाला भेटण्याकरिता वारकर्‍यांना एक तळमळ लागलेली असते. व्यथा त्यांच्या अंत:करणात असते. केव्हा मला त्या पांडुरंगाचे दर्शन होईल. पांडुरंगाचे भजन घरीच करा!

करोनाच्या कालावधीत प्रत्येकाने नियमांचे, सोशलडिस्टन्सिंगचे पालन करावे, कारण करोना संकट संपूर्ण जगावर आहे. हे संकट अजून टळलेले नाही. वाढतच चाललेले आहे. कारण आपण लॉकडाऊनमध्ये होतो, त्यावेळी करोना पसरण्याची शक्यता काहीशी कमी होते. पण आता अनलॉकमुळे लोक एकमेकांना भेटतात, दुकानात, दवाखान्यात जातात, त्यामुळे संसर्ग वाढतो आहे. म्हणून अगदी बेटातही येऊ नका, आपण घरीच राहावे, ठायीच बसावे करून एकचित्त। आवडी अनंत आळवावा॥ असा सल्ला त्यांनी वारकरी सांप्रादायाला आजच्या आषाढी एकादशीनिमित्त दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com