जीवनातील दोष घालविण्याकरिता अध्यात्माची गरज
सार्वमत

जीवनातील दोष घालविण्याकरिता अध्यात्माची गरज

महंत रामगिरी महाराज : सदगुरु गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त ‘सार्वमत’शी संवाद

Arvind Arkhade

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

जीवनातील दोष घालविण्याकरिता अध्यात्माची गरज असते, अधोगतीतून वाचायचे असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

सदगुरु गंगागिरी महाराज 173 व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त ‘दैनिक सार्वमत’शी दूरध्वनीवरुन संवाद साधताना महंत रामगिरी महाराज बोलत होते. श्रीमद भागवतातील काही अध्यायातील काही प्रसंग, सत्संग, दुसंग, भय यावर प्रकाश टाकत त्यांनी वैराग्य यावर विवेचन केले. ते म्हणाले, वैराग्य हे भयातून मुक्त करत असते म्हणून वैराग्य प्राप्त करण्यासाठी आणि संसार हा भयग्रस्त निर्माण करीत असतो म्हणून ते वैराग्य निर्माण करण्यासाठी सत्संंगाची आवश्यकता असते आणि त्याकरिता सात्विकतेची आवश्यकता असते. शुध्द सप्तगुण आपल्या अंत:करणात निर्माण होत असते.

सप्तगुण निर्माण झाल्यावर भय संपत असते, असे सांगून महंत रामगिरी महाराज म्हणाले, भगवंताने सृष्टी निर्माण केली, त्यात काही दु:खी, कुणी सुखी. शहरात एकाच बिल्डींगमध्ये एकाला मुलगा झाला म्हणून पेढे वाटतो तो सुखी, तर दुसर्‍याची आई वारली म्हणून तो दु:खी. भगवंताच्या सृष्टीमध्ये सुख-दु:ख असेल परंतु साधुच्या सृष्टीमध्ये सुख दु:ख महत्त्वाचे नाही. प्रत्यक्ष भगवंत परमात्मा सुध्दा संतांची सेवा करतात, म्हणून अध्यात्म!

संसारात रज, तम, सत्व गुण असलेल्या व्यक्ती असतात. रज गुणी गोड बोलतो, खोड काढल्याशिवाय रहात नाही. गीतेतील 17 व्या अध्यायातील तीन प्रकारच्या लोकांचे वर्णन स्पष्ट करताना ते म्हणाले, कठोर स्वभावाचा मनुष्य दुसर्‍याला दु:ख देत असेल तर तो सुखी कसा? दुसर्‍याच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याही कामात कधीतरी अडथळा येईल ना, आजही समाजात असा वर्ग आहे, तीन गुण असणारे आहेत.

हे तीन गुण म्हणजे माया आहे. अशा प्रकारचे दोष घालविण्याकरिता अध्यात्म आहे. अधोगतीपासून वाचायचे असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. सात्विक मनुष्य कर्म करत राहतो, फलाची अपेक्षा करत नाही. कर्मफलाची इच्छा करणारा स्वार्थी असतो, दु:खी असतो. स्वार्थी लोकांचे कल्याण होत नाही.

कुसंग, सत्संग आणि दुसंग यावर बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, कुसंग म्हणजे वाईट संगती, सत्संगाचे परिणाम चांगले होतात तर दुसंगाचे परिणाम वाईट होतात. संगतीचे उदाहरण देताना पाण्याच्या थेंबाचे उदाहरण महाराजांनी दिले. पाण्याचा थेंब विस्तावाच्या संगतीने नष्ट होतो. कमळाच्या फुलाच्या संगतीने शोभायमान झाला. सर्पाच्या मुखात पडला विष झाला. स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला मोती झाला.

पाण्याप्रमाणे हे आहे, पाण्यात जसा रंग टाकू तसे त्याचा रंग तयार होतो. मनाला जसा संग मिळतो तसा रंग तयार होतो. सत्संग सत्याचा मार्ग अवलंबणे म्हणजे सत्संग, महापुरुषांच्या संत्सग, विवेक प्राप्त होण्यासाठी सत्संग, विवेक नसेल ते जीवन पशुतूल्य आहे. दुसंगाचा त्याग करा, दुसंग हा बाहेर नसतो, तो आत असतो. बाहेरच्या गोष्टीचा त्याग करणे सोपे. दुसंग अंतकरणात असतो त्याचा त्याग करा. काम, क्रोध हे विद्वानाचे वैरी आहेत.

देव पाहिला का?

एकदा एका नास्तिक राजाने त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्याला विचारले, देव पाहिला का? जर उत्तर नाही दिले तर तुला फाशी देईल. त्यावर त्या सदस्याच्या नोकराने जबाबदारी घेत राजवाड्यात आला. त्याने ग्लासभर दूध बोलविण्यास सांगितले. चमचा घेऊन तो दूध हलवू लागला. अर्धा तास झाला, एक तास झाला, तो दूध हालवित होता. राजाने विचारले काय करतो? त्यावर तो म्हणाला, तूप शोधतो! राजा म्हणाला, अरे मुर्खा तुला तूप दिले असते ना? दूधातून तूप काढण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. असे कसे निघेल? त्यावर तो म्हणाला, मी या दुधात तुप शोधतोय, दूधात तूप नाही का? नाही कसे म्हणता येणार नाही, कारण तूप दुधातून निघते. पण ते काढण्यासाठी प्रक्रिया करावे लागते. तसे परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी प्रक्रिया आहे. प्रगट करण्याची प्रक्रिया आहे. ज्याचा जो विषय नाही, त्याद्वारे तुम्ही जर त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर तो दिसेल कसा? राजाचे समाधान झाले. जो इंद्रियांचा विषय नाही, तो कसा दिसेल.

टोपी आणि माकड ! - संसारात परिवर्तन स्वीकारायचे असते हे सांगताना महाराजांनी एका टोपी विक्रेता व माकड यांची गोष्ट सांगितली. पिढी बदलली म्हणजे विचार बदलतात. सतत सरकत असतो तो संसार, परिवर्तन सतत होत असते, ते स्वीकारयाचे असते. टोपी विक्रेत्याची जुनी गोष्ट माहिती वडील टोपी विक्रीसाठी जात असताना ते झाडाखाली झोपले, झाडावरील माकडांनी टोप्या वर घेऊन गेले. त्याने टोपी खाली टाकली सर्व माकडांनी टोप्या खाली टाकल्या. परंतु आता मुलगा बाजारला गेला, झाडाखाली झोपला, माकडांनी टोप्या वर नेल्या, याने टोपी खाली जमिनीवर टाकली, माकडांना माहित नव्हते खाली टोपी टाकावी असे, एका माकडाला टोपी नव्हती ते खाली उतरले व टोपी वर घेऊन गेले! पिढी बदलली विचार ही बदलतात. काळ बदलला आपणही बदलले पाहिजे.

रुढी आणि परंपरा- रुढी, परंपरेमध्ये विकृती यायला लागली की विकृतीचा अतिरेक झाला की, तिला विरोध होतो. जशी सतीची प्रथा, काही रुढींचा, परंपरेचा अतिरेक होतो. काही प्रतिष्ठेकरिता प्रथा असतो. आपल्या संस्कृतीमध्ये काही रुढी परंपरा आहे त्या टिकविल्या पाहिजे. त्यात काही विकृती असेल तर त्या दूर केल्या पाहिजे. संस्कृतीमध्ये संक्रांतीच्या तिळगुळाचे महत्व महाराजांनी स्पष्ट केले. होळीला वाईट विचार जळून जावेत.

Deshdoot
www.deshdoot.com