थंडीतही राजुरी गावचे राजकारण तापले

ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी
थंडीतही राजुरी गावचे राजकारण तापले

राजुरी |वार्ताहर| Rajuri

ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची होणार की बिनविरोध याबाबत राजुरी गावातील ग्रामस्थांमध्ये सध्या चर्चा रंगू लागल्या असून सोसायटी सारखीच ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची होते की एकतर्फी हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

राहाता तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायतीची मुदत संपली असून निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीत उभे राहण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे, अण्णासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत कामकाज करत असून गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विखेंच्या दोन गटांमध्ये समझोता एक्सप्रेस धावली. परंतु काही ठिकाणी एकमत न झाल्याने काही जागांसाठी निवडणूक लढवली.

विखेंचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने निवडणूक चुरशीची झाली. त्याच निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी श्रेष्ठींनी आत्तापासूनच लक्ष घालून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गावातील पुढार्‍यांना एकत्र बसून जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण 11 जागा असून सरपंचपद सर्वसाधारण स्त्री जागेसाठी राखिव आहे. वॉर्ड नंबर 1 व 4 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी प्रत्येकी दोन जागा असल्यामुळे येथे सरपंच पदासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे.

कितीही जणांनी बाशिंग बांधले तरी विखे पाटील सांगतील त्याचीच वर्णी सरपंचपदी लागणार आहे. पुढारी सध्या गावातील हॉटेलवर, सार्वजनिक ठिकाणी चमकू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या तरी विखेंच्याच दोन गटांमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता असून तिसरा गट विरोधी पक्षाचा होतो की अपक्षांचा हे थोड्याच दिवसांत कळणार आहे. गत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या राजुरी सोसायटीच्या निवडणुकीसारखी ही निवडणूक एकतर्फी होते की बिनविरोध हे थोड्या दिवसात कळेल. ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू झाली असून ऐन थंडीत राजुरी गावचे राजकारण तापायला सुरूवात झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com