राजुरीत भूमी अभिलेखच्या मोजणीनंतर ग्रामपंचायतीने रोवलेले पोल काढून टाकले

अतिक्रमण करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल
राजुरीत भूमी अभिलेखच्या मोजणीनंतर 
ग्रामपंचायतीने रोवलेले पोल काढून टाकले

राजुरी |वार्ताहर| Rajuri

भुमी अभिलेख कार्यालय यांनी मोजणी करून सीमा निश्चित करून दिलेल्या जागेवर राजुरी ग्रामपंचायतीने पोल रोवले होते. मात्र अतिक्रमण केलेल्या एका जणाने हे पोल काढून टाकले. याप्रकरणी सरपंच सुरेश नारायण कसाब व सदस्यांनी या इसमाविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

राहाता तालुक्यातील राजुरी येथील घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायती मालकीचे गट नंबर 246. 330 516 मध्ये असलेल्या क्षेत्रात जागा दिली आहे परंतु गट नंबर 246 मधील ग्रामपंचायत मालकीचे क्षेत्रावर लगतच्या रामकृष्ण वाणी व सहकारीधारकांनी अतिक्रमण केले.. सदर क्षेत्राची उपअधीक्षक भूमी अभिलेख राहाता यांच्यामार्फत जमिनीची दि. 15 जानेवारी 2021 रोजी ईटीएस यंत्राद्वारे मोजणी करून दिली आहे.

सदर क्षेत्राच्या लगतच्या सहधारक शेतकर्‍यांना उपअधीक्षक भूमी अभिलेख राहाता यांच्याकडून हद्द दाखविण्याची नोटीस बजावून मोजणी केली. मोजणी नुसार सदर शेत्राचे अंतिम सीमा निश्चिती करून दिली होती. या सीमा निश्चित केलेल्या जागेत लोखंडी व सिमेंट पोल काँक्रीटमध्ये रोवून खुणा कायम केल्या होत्या परंतु 1 जून 2021 रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी पहाणी करण्यासाठी गेले असता या ठिकाणी लावलेले लोखंडी व सिमेंटचे पोल सिमेंट काँक्रीटमध्ये रोवून कायम केलेल्या खुणा रामकृष्ण वाणी यांनी अनाधिकाराने काढून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.

या भागातील आदिवासी नागरिकांना घरकुल देण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर पडला असल्यामुळे लोणी पोलीस स्टेशनला रामकृष्ण वाणी यांचेविरुध्द भारतीय दंड संहिता 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस ठाणे अथमलदार फटांगरे करत आहेत.

या घटनेमुळे बापू राजाराम मोरे, श्रीमती अलका रघुनाथ बोरसे, सखाहरी रामदास बर्डे, चंद्रभागा रामनाथ बर्डे, अशोक बाबुराव पवार, बाळासाहेब बाबुराव पवार, जयसिंग तुकाराम बोरसे, श्रीमती रंगुबाई पंढरीनाथ गायकवाड, संजय पंढरीनाथ गायकवाड, यांच्यासह अनेक आदिवासी नागरिकांना घरकुल मिळण्यास अडचण होत असल्याची माहिती सरपंच सुरेश नारायण कसाब, उपसरपंच सुधाकर दादा गोरे, सदाशिव रामदास दरेकर, डॉ. सोमनाथ बाळासाहेब गोरे, भाऊसाहेब भिमाजी गोरे, अर्जुन नामदेव कदम, ग्रामसेवक रवींद्र बोरसे यांनी दिली.

राधाकृष्ण सोपान वाणी यांनी सांगितले की, आम्हाला कोणतीही सूचना न देता पोल लावले. माझी तेथे वैयक्तिक 80 आर जमीन असून ती मला माझ्या उतार्‍याप्रमाणे मोजून द्यावी. उर्वरित जमीनही ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी त्याच माझी कोणतीही हरकत नाही परंतु राजुरी ग्रामपंचायतीची 90 एकर जमीन आहे ती ही माझ्याप्रमाणेच ग्रामपंचायतीने काढून ग्रामपंचायतीच्या ताब्यात घ्यावी, अशी माझी मागणी असून फक्त माझ्यासारख्या गरीब कुटुंबावर असा अन्याय का? असा सवाल त्यांनी केला.

आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ सुजय विखे पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील एकही लाभार्थी घरकुल लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी लक्ष घालून प्रत्येक लाभार्थ्यांना जागा देऊन कसे घरकुल देता येईल यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना पदाधिकायांना केल्या होत्या. त्याचीच पूर्तता आम्ही आता करत असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com