रस्त्यावर उतरल्याशिवाय ऊस प्रश्न सुटणार नाही - राजु शेट्टी

पारनेर तालुक्यात ऊस परिषदेत आवाहन
रस्त्यावर उतरल्याशिवाय ऊस प्रश्न सुटणार नाही -  राजु शेट्टी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कमी भाव देऊन अन्याय करत करत आहे. तसेच बहूतांश साखर कारखाने काट्यामध्ये शेतकर्‍यांचा ऊस लुटतात असा आरोप करत आता शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी केले.  

पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओला दूष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रूपयांची मदत मिळावी, कारखान्यांकडून होणारी शेतकर्‍यांची लूट थांबवावी या मागण्या संदर्भात ऊस परिषदेचे आयोजन केले होते,यावेळी राजू शेट्टी बोलत होते. दरम्यान, राजू शेट्टींचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य स्वागत करत मांडवे खुर्द चौकापासून ते सभास्थळापर्यंत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की, मुकादमांकडून शेतकर्‍यांची आर्थिक लुट होत असल्यानं मुकादम व्यवस्था संपवावी. बांधकाम मजुरांप्रमाणे महामंडळानं ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकर्‍यांची देखील फसवणूक करतात त्यामुळे मुकादम व्यवस्था संपवावी अशी मागणी यावेळी राजू शेट्टींनी केली. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी पेक्षा दोनशे रुपये जास्त मिळावे. आदी मागण्या केल्या असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा देखील शेट्टींनी दिला आहे. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब टेकूडे हे होते. व्यासपीठावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, राज्य सचिव किरण वाबळे, भूमिपुत्र शेतकरी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल उगले, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे, बैलगाडा संघटना अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब झांबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, भूमिपुत्र संघटनेचे तालुका संघटक महेश झावरे, मांडवे खुर्दचे सरपंच सोमनाथ आहेर, गारगुंडी गावचे उपसरपंच प्रशांत झावरे पाटील, गुरुदत्त पतसंस्थेचे संचालक स्वप्निल झावरे, जगदीश गागरे, रामदास घावटे, कारभारी आहेर, ग्रामपंचायत सदस्य सुदाम शिर्के आदि उपस्थित होते.

7 ला मोर्चा, 17 ला ऊस वाहतुक बंद  

सर्व साखर कारखान्यांच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येत्या 7 नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार असून सरकारने गांभिर्याने लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com