सनदशीर मार्ग संपला तर वेगळा मार्ग धरू

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी : नगरला दूध दरासाठी उत्पादकांचा मोर्चा
सनदशीर मार्ग संपला तर वेगळा मार्ग धरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या लोकडाऊनचा काळा असून त्याचे कारण सांगून दुधाचे दर पाडले जात आहेत. मुळात शेतकर्‍यांचा आणि लोकांचा काहीही संबंध नाही. दोन वर्षांपूर्वी दुधाला दर देण्याचा प्रयोग झाला मग आता का नाही? मंत्र्याच्या गाडी बंगल्यावर खर्च करता, परंतु शेतकर्‍यांना न्याय देण्याची सरकारची भूमिका दिसत नाही.

निर्णय घेतला नाही तर आंदोलन सुरू राहील. सनदशीर मार्ग संपला तर वेगळा मार्ग धरू. आम्ही पोकळ धमकी देत नाही. सरकारला गुडघे टेकायला लावू. सरकार कुणाचेही असो, गुडघे टेकायलाच लावू. कोल्हापुरात शेवटचा मोर्चा काढल्यानंतर पुढील ठरवली जाणार इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला.

दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावे, देशात व राज्यात पडून असलेल्या दूध पावडरीच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आकारली जाणारी जीएसटी कमी करावी या मागण्यांसाठी काल (गुरूवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष बंगाळे, जिल्हाध्यक्ष रवी मोरे व सुनील लांढे, कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे, स्नेहल फुंदे, रमेश कचरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी शेट्टी म्हणाले. राज्यात 1 कोटी 19 लाख गाईच्या दुधाचे संकलन होते. त्यातील 67 लाख पॅकिंगमधून विक्री होते. त्याची विक्री किंमत ठरलेली. बाजार अडचणीत नाही. प्रश्न पॅकिंगला जात नसलेल्या दुधाचा आहे. 50 लाख लिटर दुधालाच अनुदानाची गरज आहे. 32 रूपये उत्पादन खर्च, 15 रूपये तोटा आहे.

देशात दोन लाख टन भक्ती शिल्लक असतानाही केंद्र सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे हे दुर्दैवी आहे. कोल्हापुरात शेवटचा मोर्चा काढल्यानंतर पुढील ठरवली जाणार असल्याचे शेट्टी म्हणाले. सदाभाऊ खोत यांनी दोन वर्षापुर्वी संप मोडला. आता शेट्टी यांच्यावर टीका केली तर धडा शिकवू असा इशारा जिल्हाध्यक्ष रवी मोरे व सुनील लोंढे यांनी दिला.

दुरवरच मोर्चा अडवला

दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा निघणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून पाचशे मीटरवरच मोर्चा अडवला. रस्ता अडवण्याची तशी तयारी पोलिसांनी आधीच केली होती. मोर्चा अडवल्यावर शेट्टी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून भाषणे झाली. शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही तर हिंसक अंदोलन करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

मुठभर लोकांसाठी योजना राबविली ?

दूध दरासाठी राज्य सरकारने बाजार हस्तक्षेप योजना करून त्यातून 6 कोटी लिटर दूध 25 रुपये लिटरने खरेदी केले. शेतकर्‍यांना याचा काहीही फायदा झाला नाही. मुठभर लोकांसाठी ही योजना सरकारने केली. शेतकर्‍यांना फायदा होणार नव्हता तर योजना केली कशाला असा प्रश्न माजी खा. शेट्टी यांनी उपस्थित केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com