
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राहुरी येथील राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेतील सात कोटी 37 लाख 62 हजार 78 रुपयांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व मॅनेजरविरोधात सुमारे साडे चार हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. एकूण नऊ जणांविरूध्द 14 नोव्हेंबर 2022 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नगर यांच्या आदेशान्वये सहकारी संस्था राहुरी येथील लेखापरीक्षक संजय धनवडे यांनी राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेचे 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 या कालावधीचे फेरलेखापरीक्षण केले होते. यामध्ये निष्पन्न झालेल्या अहवाल व कागदोपत्री दस्तऐवजांवरून पतसंस्थेत सात कोटी 37 लाख 62 हजार 78 रूपये रकमेचा संस्थेचा विश्वास घात करून फसवणूक व अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामुळे सहायक निबंधक सहकारी संस्था, राहुरी यांच्या आदेशाने धनवडे यांनी 14 नोव्हेंबर 2022 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिलेल्या फिर्यादीवरून मॅनेजर कारभारी फाटक (रा. टाकळीमिया, ता. राहुरी), चेअरमन भाऊसाहेब येवले (रा. नांदूर रस्ता, राहुरी), व्हा. चेअरमन शरदराव निमसे (रा. अस्तगाव माथा, राहाता), लेखनिक सुनील भोंगळ (रा. भोंगळ वस्ती, जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी), उत्तम तारडे (रा. केंदळ ता. राहुरी), सुरेखा सांगळे (रा. राहुरी), तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक सुरेश पवार (रा. जोगेश्वरी आखाडा, राहुरी) व दीपक बंगाळ (रा. राहाता) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून मॅनेजर फाटक, चेअरमन येवले व व्हा. चेअरमन निमसे यांच्याविरूध्द गुन्हे शाखेने सुमारे साडे चार हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. येवले व निमसे अटकेत असून फाटक याला अटक करण्यात आली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. इतरांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.