
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीतील राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. शासकीय लेखा परीक्षणात 7 कोटी 37 लक्ष 62 हजार रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट होताच 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील पतसंस्थेचा व्हा. चेअरमन शरद निमसे याला पोलिसांनी काल राहाता येथील राहात्या घरातून गजाआड केले असून न्यायलयाने दि. 14 डिसेंबरपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे.
राहुरी येथील राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये मोठा अपहार झाल्याने ठेवीदार अडचणीत सापडले होते. अनेक तक्रारीनंतर जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार लेखा परीक्षक संजय धनवडे व सहाय्यक अनिल निकम, रियाज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्यात आले. 1 एप्रिल 2016 ते सन 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये झालेल्या सर्व व्यवहारांच्या चौकशीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार करण्यातआल्याचे उघडकीस आले.
राजमाता पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले, येवले, उपाध्यक्ष शरदराव निमसे, मॅनेजर कारभारी फाटक, सुनील भोंगळ, उत्तम तारडे, सुरेखा सांगळे, सुरेश पवार, दत्तात्रय बोंबले, दीपक बंगाळ या 9 जणांनी पतसंस्थेमध्ये 7 कोटी 37 लक्ष 62 हजार रुपयांचा अपहार केल्याचा लेखा परीक्षणात ठपका ठेवण्यात आला आहे.
राहुरी पोलिसात लेखापरीक्षक संजय धनवडे यांनी दिवाळीपुर्वी फिर्याद दिली होती. त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर राहुरी पोलीसांनी या 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे सर्व आरोपी पसार झाले आहे.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी मोठ्या शिफीतीने पोलिस पथकासह निमसे याला गजाआड केले आहे. उर्वरित 8 आरोपींनाही लवकरच अटक करण्यासाठी पथके रवाना केली असून तेही लवकरच सापडतील असा विश्वास पो.नि. दराडे यांनी व्यक्त केला. काल निमसे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 डिसेंबर पर्यंत 4 दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली आहे.