राजमाता पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपी शरद निमसेला न्यायालयीन कोठडी

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 8 आरोपी अद्यापही पसार
राजमाता पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपी शरद निमसेला न्यायालयीन कोठडी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुका (Rahuri) राजमाता जिजाऊ पतसंस्थेचा (Rajmata Jijau Credit Union) उपाध्यक्ष शरद लक्ष्मण निमसे (Sharad Nimse) याला अहमदनगरच्या न्यायालयाने (Ahmednagar Court) न्यायालयीन कोठडी सुनावली. संस्थेतील 7 कोटी 37 लाख रुपये घोटाळा प्रकरणी निमसे 9 डिसेंबरपासून तुरुंगात आहे. अन्य 8 आरोपी मात्र अद्यापही पसार आहेत.

याबाबत माहिती अशी की, राहुरी (Rahuri) शहरातील राजमाता जिजाऊ पतसंस्थेत (Rajmata Jijau Credit Union) काही महिन्यांपूर्वी घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. याबाबत सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने पतसंस्थेची सखोल तपासणी करून अहवाल सादर केला होता. त्या अहवालात अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकासह 9जण दोषी आढळून आले आहेत.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात 9 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पसार झाले होते. मात्र शरद निमसे याला काही दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातून अटक करून जेरबंद करण्यात आले होते. त्याला अहमदनगर येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

सोमवारी शरद निमसे याला पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेतील आरोपी पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब येवले, व्यवस्थापक कारभारी फाटक, कर्मचारी सुनील भोंगळ, उत्तम तारडे, सुरेखा सांगळे, लेखापरीक्षक दत्तात्रय बोंबले, सुरेश पवार, दीपक बंगाळ हे अद्याप फरार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com