सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजहंस दूध संघाला राष्ट्रीय पुरस्कार

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजहंस दूध संघाला राष्ट्रीय पुरस्कार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍या संगमनेर तालुका सहकारी दूध संघाला ई - मार्केटमध्ये सक्रिय सहभागाबद्दल नॅशनल को - ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

गुजरात मधील गांधीनगर येथे नॅशनल को - ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 2021-22 चा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शानदार कार्यक्रमात राजहंस दूध संघाला प्रदान करण्यात आला. यावेळी दूध संघाचे चेअरमन व महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, गुजरात सरकारच्या सहकार विभागाचे जगदीश पांचाळ, रिझर्व बँक ऑफ इंडिया चे संचालक सतीश मराठे, एनडीडीबी चे अध्यक्ष मिनेश शहा, एनसीडीएफआयचे अध्यक्ष मंगल जीत राय, व्यवस्थापकीय संचालक के. सी. सुपेकर आदी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका सहकारी दुध संघ हा मागील चार वर्षापासून एनसीडीइएफआय (नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया ) शी सलग्न असून ई - मार्केटिंगचे काम करत आहे. एन.सी.डी.एफ. आय. शी देशभरातील सुमारे 223 जिल्हा दूध संघ संलग्न असून या सहकार चळवळीने भारताला खर्‍या अर्थाने स्वावलंबी बनवले आहे.

संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्था या गोरगरिबांच्या जीवनाशी निगडित आहेत. आदर्शवत तत्वांचे पालन करत निष्ठेने व काळजीपूर्वक काम होत असल्यामुळे या सहकारी संस्था देशात अग्रगण्य ठरल्या आहेत. करोना संकटात राजहंस दूध संघ हा दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून एकही दिवस बंद घेतला नाही. उलट दूध उत्पादकांना दिलासा देत लॉकडाउनच्या काळात राजहंस दूध संघाने शेकडो मेट्रिक टनाची दूध पावडर बनवली होती. अडचणीच्या काळातही अत्यंत काटकसरीतून वाटचाल करून शेतकर्‍यांच्या जीवनात व ग्रामीण भागात समृद्धी निर्माण करणार्‍या या दूध संघाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

दूध संघाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल दूध संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, महानंदचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सत्यजित तांबे, बाबासाहेब ओहोळ, अमित पंडित, लक्ष्मणराव कुटे, शंकर पा. खेमनर, संपतराव डोंगरे, सौ.सुनंदाताई जोर्वेकर, विश्वासराव मुर्तडक, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, डॉ.जयश्रीताई थोरात यांनी अभिनंदन केले आहे.

सांघिक कामाचे यश - देशमुख

दुष्काळी तालुका ते प्रगतिशील तालुका असा लौकिक निर्माण करण्यात दूध संघाचा मोठा वाटा आहे. दूध संघाने राज्याबाहेर ही सुरत, कर्नाटक मध्येही मोठी बाजारपेठ उपलब्ध केली आहे. दूध संघाच्या या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीमध्ये मार्गदर्शक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दूध संघाचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, अधिकारी - कर्मचारी या सर्वांचे योगदान असून हे सांघिक यश असल्याचे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले असून हीच वाटचाल यापुढेही राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.