‘राजहंस’च्या माध्यमातून दूध उत्पादकांना मोफत चारा बियाणे

‘राजहंस’च्या माध्यमातून दूध उत्पादकांना मोफत चारा बियाणे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले. सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे दुधाच्या दरात घसरण होऊन दूध उत्पादक अडचणीत आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकर्‍यांना अडचणीच्या काळात आधार मिळवा यासाठी जनावरांना चारा पिकासाठी 110 मेट्रिक टन मोफत बियाणे देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंदचे व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, जगभरात करोना या रोगाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. करोनाचा सर्वच उद्योग धंद्याना व दुग्ध व्यावसायाला देखील मोठा फटका बसला आहे. शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे व हॉटेल, मंदिर, महाविद्यालय, शाळा व इतर सर्व व्यवसाय तसेच लग्न कार्यक्रम बंद असल्यामुळे दुधाची मागणी कमी झाली आहे. त्याचा तोटा दूध संघ व दूध उत्पादक शेतकरी यांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

दूध उत्पादक हा दूध संघाचा पाया असून नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अडचणीच्या काळात दूध उत्पादकांना मदत व्हावी यासाठी राजहंस दूध संघाने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चारा बियाणे मागणी केली होती.त्यापैकी 110 मेट्रिक टन बियाणे प्राप्त झाले असून येत्या चार पाच दिवसात मका, ज्वारी, बाजरी, गवत या चारा पिकांचे बियाणे स्थानिक दूध संस्थाच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकर्‍यांना मोफत दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अडचणीच्या काळात राजहंस दूध संघ नेहमी दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठिशी उभा राहिला आहे.दूध उत्पादकांना दूध उत्पादनावरील खर्च कमी व्हावा व उत्पादन वाढवावे यासाठी विविध योजना राबवत आहे. दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उच्च प्रतीचे राजहंस पशुखाद्य, मिनरल मिक्चर, कॅल्शियम, उत्पादकांसाठी अनुदानित तत्वावर उपलब्ध केले असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.

महागाईचा भडका उडालेला असल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. अशा प्रसंगी राजहंस दूध संघ शेतकर्‍यांच्या पाठीशी मदतीसाठी खंबीरपणे उभा राहत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच राजहंस दूध संघाच्या माध्यमातून उच्च प्रतीचे मका, ज्वारी, व विविध प्रकारचे गवत असे एकूण 110 मेट्रिक टन बियाणे दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोफत दिले जाणार आहे.

-रणजितसिंह देशमुख अध्यक्ष, महानंद व राजहंस दूध संघ संगमनेर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com