कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप ओसरलेला नसून शहरी भागांपेक्षा ग्रामीण परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

भविष्यातले हे संकट लक्षात घेऊन गावोगावच्या नेते मंडळींनी राजकीय हेवेदावे बाजुला सारून येत्या 15 जानेवारी रोजी होणार्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करून एक नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केले.

श्री. परजणे यांनी म्हटले आहे, कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील सुमारे 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या 15 जानेवारी रोजी होत आहेत. करोना महामारीच्या गंभीर परिस्थितीतून आपल्या सर्वांची वाटचाल सुरू असताना अशा काळात ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्यास भविष्यात ही बाब अधिक अडचणीची ठरू शकते.

निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांचे प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणे, मतदारांबरोबर हस्तांदोलन करणे, कार्यकर्त्यांची एकत्रित गर्दी होणे, ठिकठिकाणी बैठका, कॉर्नर सभा आयोजित करणे अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थ व कार्यकर्ते एकत्र येण्यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव फैलावण्याची दाट शक्यता आहे.

गावाच्या विकासासाठी राजकीय हेवेदावे बाजुला सारून ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध केल्यास एक चांगला पायंडा पडून नवीन आदर्श निर्माण करता येऊ शकतो.

करोना संसर्गाची भीती मात्र कायम असल्याने भविष्यातील गंभिर परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाभरातील गावोगावच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येत्या 15 जानेवारी रोजी होणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात असेही आवाहन त्यांनी केले.