अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेत प्रत्यक्षातील सर्वसाधारण सभा झालेली नाही. नगरसह राज्यात करोना प्रतिबंधात्मक उपाय करून

निवडणुका, समारंभ आणि अन्य बाबी सुरू आहेत. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आणि पदाधिकारी यांनी गुरूवारी होणारी सर्वसाधारण सभा घ्यावी. करोनाच्या नावाखाली या सभेला अन्य फाटेफोडू नयेत, असा आक्रमक पवित्रा ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी घेतला आहे.

गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेत ऑनलाईन सभा घेण्यात येत आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज जवळपास ठप्पच झाले आहे. यासह सदस्यांची कामे होत नसल्याने ग्रामीण भागातील जनता ही सदस्यांना जाब विचारात आहे. ग्रामीण भागाच्या हिताच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेची प्रत्यक्षात होणारी सभा आवश्यक आहे. ही सभा न झाल्यास त्याचा ग्रामीण जनतेला मोठा तोटा होणार आहे.

राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहे. मात्र, नगरची स्थिती बरी आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने करोनासंबंधी सर्व उपाययोजना करून सर्वसाधारण सभा घ्यावी, जेणेकरून सदस्यांच्या शंका आणि प्रश्नांचे निरसन होणार आहे. पुन्हा करोनाच्या नावाखाली ऑनलाईन सभेचे भूत नाचविल्यास त्याचा फटका सदस्यांना आणि जनतेला बसणार आहे.

असे झाल्यास जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्कावर गदा येणार असून यावेळी सदस्य गप्प बसणार नाहीत, असा इशारा सदस्य परजणे यांनी दिला आहे. करोनासंदर्भात असणारे सर्व नियम सदस्य आणि अधिकारी पाळणार असल्याने गुरूवारी होणारी सर्वसाधारण सभा अजेंडा आणि नियोजित ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात व्हावी, अशी अपेक्षा सदस्य परजणे यांनी व्यक्त केली आहे.