शासनाने धरण पाणलोट क्षेत्रावर कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा : परजणे
सार्वमत

शासनाने धरण पाणलोट क्षेत्रावर कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा : परजणे

Arvind Arkhade

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

गेल्या दोन महिन्यापासून पावसाळा सुरु झालेला असला तरी मध्य महाराष्ट्रात व प्रामुख्याने नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने भविष्यात शेतीच्या पाण्यासाह पिण्याच्या पाण्याची गंभिर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासनाने धरण क्षेत्रावर कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा अशी मागणी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

परजणे यांनी निवेदनात म्हटले आहे, पावसाळ्याचे दोन महिने निघून गेलेले आहेत. नाशिक जिल्हयातल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नाही. उर्वरीत दोन महिन्यात जर पाऊस झाला नाही तर शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची गंभिर समस्या निर्माण होऊ शकते. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीला पडलेल्या मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकर्‍यांनी कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग, तूर, मूग पिकांच्या पेरण्या केल्या.

परंतु पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. धरण क्षेत्रावर कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला गेला तर गावोगावच्या पाणी पुरवठ्याच्या योजना, गांवतळे, ओढे नाले धरणाच्या पाण्याच्या रोटेशनमुळे भरली जावून पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. माणसांसह शेती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

शासनाने वेगवेगळ्या कार्यक्रमांवर कोट्यावधीचा खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची आज गरज आहे. सद्या आभाळात ढग भरुन येतात परंतु पाऊस पडत नाही. कृत्रिम पावसासाठी चांगले वातावरण आहे. शासनाने याचा गांभिर्याने विचार करुन धरणांच्या पाणलोट क्षेत्रावर कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवावा अशीही मागणी राजेश परजणे यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com