मराठी माणसाचा इतिहास त्याग, शौर्य, बलिदान व पराक्रमाचा

जिल्हाप्रमुख झावरे यांची राज्यपाल कोश्यारींवर टीका
मराठी माणसाचा इतिहास त्याग, शौर्य, बलिदान व पराक्रमाचा

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

मराठी माणसाचा इतिहास त्याग, शौर्य, बलिदान व पराक्रमाचा आहे. पण हे कोश्यारी सारख्या भंपक माणसाला महाराष्ट्रात राहून देखील कळले नाही. मराठी माणूस पोटभरण्यासाठी इतर राज्यात गेला नाही आणि गेला तर तो राज्य करण्यासाठीच गेला ही वस्तुस्थिती आहे. हे राज्यपालांनी समजून घ्यावे, अशी टिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर शिवसेना जिल्ह्याप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केली आहे.

राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत झावरे पुढे म्हणाले की, मराठी माणूस सर्व धर्मियांना व सर्व राज्यातील लोकांना सामावून घेणारा आहे. उद्योजकांना येथे सुरक्षितता मिळते, त्यामुळेच सर्व जाती धर्माचे उद्योजक महाराष्ट्रात उद्योगधंदे शांततेने करू शकतात. त्या मराठी माणसाचा अपमान जर राज्यपाल असलेली व्यक्ती करीत असेल तर त्याला कोल्हापुरी जोडा मारलाच पाहिजे. राज्यपाल म्हणतात ते खरे असेल तर गुजरातची राजधानी गांधीनगर व राजस्थानची राजधानी जयपूर हे भारताची आर्थिक राजधानी का झाले नाही.

याचाच अर्थ मराठी माणसाच्या योगदानामुळेच मुंबईचे वैभव टिकून आहे याची या भंपक कोश्यारींनी नोंद घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे याच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. इतकच नाही तर अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून उभारलेल्या महाराष्ट्राचा इतका तिरस्कार असेल तर त्यांनी दुसर्‍या कोणत्याही राज्यांत जावे. राज्यपाल कोणाची भाषा बोलताय हे न कळण्या इतकी महाराष्ट्राची जनता वेडी नाही. नगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करतो, असेही श्री. झावरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com