लंघेना स्वतःवर भरवसा नाही काय?

पुनर्रचनेबद्दल आयुक्तांकडे दाखल हरकतीवरून चर्चा गरम
लंघेना स्वतःवर भरवसा नाही काय?

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

गट व गण पुनर्रचनेबद्दल राजेंद्र लंघे यांनी नाशिक आयुक्तांकडे दाखल केलेल्या हरकतीनंतर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ज्या मतदारांनी जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले त्या गटाच्या पुनर्रचनेवर हरकत घेताना मतदारांवर, पदावर असताना केलेल्या विकास कामावर भरवसा नाही काय? असा प्रश्न चर्चेत आल्याने हरकत राजेंद्र लंघे यांची असली तरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचनेत लंघे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या कुकाणा गटाचे अस्तित्व संपुष्टात येऊन विशेषतः पंचायत समितीच्या कुकाणा गणातील काही गावे बेलपिंपळगांवच्या प्रवरासंगम गणाला तर काही गावे नव्याने अस्तित्वात आलेल्या सलाबतपूर गटातील सलाबतपूर गणाला जोडली गेली आहेत. यातील लंघे यांचे होम पिच समजले जाणार्‍या शिरसगांवचा बेलपिंपळगांव गटात समावेश झाला आहे. लंघे यांना यापूर्वी याच बेलपिंपळगांव गटाने भरभरुन साथ दिली आहे.

याचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण या पुनर्रचनेबद्दल राजेंद्र लंघे यांनी नाशिक आयुक्तांकडे दाखल केलेल्या हरकतीमागे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भुषविलेल्या विठ्ठलराव लंघे यांनीच त्यांना प्रवृत्त केले असावे अशी चर्चा तालुक्याच्या झडत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या काळात त्यांच्याकडून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्याचा दावा केला जातो. या हरकतीमुळे त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हरकतीत लंघे यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या गट व गणाच्या प्रारुप आरखाडयामध्ये नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगांव गट क्रमांक 34 व त्यातील प्रवरासंगम गणातील रचनेबाबत आमची हरकत असून सदर गट व गणाची रचना ही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे तसेच नियमाचे पालन न करता व गटातील जनतेच्या सोईचे न करता गैरसोईचे नियोजन करुन हेतुपुरस्सर चुकीची रचना करण्यात आलेली आहे.

सदर प्रारुप आराखाडयाच्या नकाशाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, निवडणूक आयोगाने सुचित केल्याप्रमाणे नैसर्गिक खुणा व मोठे रस्ते सदर नकाशा 7 मध्ये दर्शविण्यात आलेले नाही. तसेच नेवासा तालुक्यातून जाणार्‍या गोदावरी, प्रवरा, मुळा या नदया तसेच इतर नदया नाले दर्शविण्यात आलेले नाही. तसेच नेवासा तालुक्यातून असलेले मोठे राज मार्ग, नगर-औरंगाबाद, शेवगांव- श्रीरामपुर, घोडेगांव ते राहुरी, भेंडा ते टोका म्हाळापुर हे रस्ते या प्रमुख हद्दी ज्या आधारे गट व गणाच्या रचनेकामी मुख्य उपयोगात आणण्याचे सुचना केल्या होत्या, ते प्रमुख रस्ते सुध्दा दाखविण्यात आलेले नाहीत.

त्यामुळे सदरची गट व गण रचना ही सदोष असून योग्य पध्दतीने झालेली नाही. राज्य निवडणुक आयोगाने गट व गणाची रचना करतांना निर्वाचक गण हा भौगोलिक दृष्टया सलग असला पाहिजे अशी स्पष्ट सुचना केलेली आहे. परंतु प्रवरासंगम गणाची रचना करतांना भौगोलीक दृष्टया सलग भूभागाचा विचार करण्यात आलेला नाही व सदर गण रचना करताना निवडणुक आयोगाने उत्तरेकडून पूर्वेकडे गण रचना करण्याबाबत निर्देश दिलेले असतांना सदर गणाच्या रचनेमध्ये सदर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

प्रवरासंगम गणाच्या रचनेत एकूण 9 ग्रामपंचायतीचा समावेश केलेला असून त्यांची लोकसंख्या 20826 एवढी ठेवण्यात आलेली आहे. परंतु सदर गणात गण रचना करतांना हेतु पुरुस्सर पुर्वेकडील प्रवरासंगम गावाजवळील गावे वगळून अतिपुर्वेकडील गावांचा नियम डावलून समावेश केलेला आहे. वास्तविक पाहता प्रवरासंगम गावाच्या शिवेलगत असलेली मोठी लोकसंख्या असलेली गावे वगळण्यात आलेली आहेत. वास्तविक पाहता लगतच्या गावांचा समोवश पूर्वीच्या बेलपिंपळगांव गटात होता व भौगोलीक दृष्टया सदरची गावे ही बेलपिंपळगांव गट व प्रवरासंगम गणाला लागून असून त्यांचा समावेश प्रवरासंगम गणामध्ये योग्य रितीने करता येतो. परंतु सदर बाब मुद्दाम होवुन हेतु पुरस्सर टाळण्यात आलेली आहे.

प्रवरासंगम गण रचने मध्ये अतिपुर्वेकडील वरखेड व शिरसगांव या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता सदरची दोन्ही ग्रामपंचायती या प्रवरासंगम पासुन दुर अंतरावर असून बेलपिंपळगांव गटासाठी अतिशय लांब व बेलपिंपळगांव गावापासुन 45 ते 50 किलोमिटर लांब आहे. सदरची दोन्ही गावे ही कामकाजाच्या दृष्टीने तसेच भौगोलीक आरखाडयानुसार बेलपिंपळगांव गटासाठी व प्रवरासंगम गणासाठी अनाआवश्यक व चुकीच्या पध्दतीने समाविष्ट केलेली आहे.

सदर शिरसगांव व वरखेड या ग्रामपंचायतीचे लगतचे गावांचा समावेश सलाबतपुर गणामध्ये करण्यात आलेला आहे. शिरसगाव व वरखेड ही गावे सलाबतपुर गणासाठी व गटासाठी भौगोलीक दृष्टया सोईचे व कामाच्या दृष्टीने योग्य आहेत. तर सलाबतपुर गणामध्ये समाविष्ट केलेली इतर गावे प्रवरासंगम गणासाठी योग्य व बरोबर आहे. परंतु सदर प्रारुप आराखडा जाहीर करतांना चुकीच्या पध्दतीने सदर गावांची अदलाबदल करण्यात आलेली आहे, असे मुद्दे या हरकतीमध्ये आहेत.

ज्या बेलपिंपळगांव गटाने राजकीय जीवनात भरभरुन दिले त्याच बेलपिंपळगांव गटात त्यांच्या होम पिचचा समावेश झाल्यानंतर समाधान व्यक्त होण्याऐवजी हरकत घेणे चर्चेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com