32 कोटींचा थकबाकीदार ‘अमृत’चा पदाधिकारी कसा?

‘अर्बन’चे सभासद चोपडा यांचा सवाल
32 कोटींचा थकबाकीदार ‘अमृत’चा पदाधिकारी कसा?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेची सुमारे 32 कोटी रुपयांची थकबाकी असणारा संगमनेर येथील एका पतसंस्थेचा अध्यक्ष आहे. सहकार आणि मल्टीस्टेट कायद्यानुसार थकबाकीदार कोणत्याही वित्त संस्थेचा संचालक, पदाधिकारी होऊ शकत नाही, असे असतानाही एकजण अमृत नामक पतसंस्थेत अध्यक्ष कसा राहू शकतो, असा सवाल नगर अर्बन बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केला आहे. थकबाकीदारांकडून सुमारे 30 कोटींची वसुली करावी, असा न्यायालयाचा आदेश असूनही बँकेचे अधिकारी, संचालक हे या मोठ्या थकबाकीदारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वसुली करत नसल्याची खंत चोपडा यांनी व्यक्त केली.

स्व. दिलीप गांधी यांच्या कार्यकाळात बँकेत मोठा कर्ज घोटाळा झाला. या घोटाळ्यामध्ये बँकेचे अधिकारीही सामील आहेत. या सर्वांच्या संगनमताने बँकेची वाटचाल बुडीताकडे झाली असून आजही नवीन संचालक, अधिकारी कर्जदार, थकबाकीदारांना पाठिशी घालत आहेत, नगर अर्बन बँकेच्या 12 बोगस थकबाकीदारांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचेही चोपडा म्हणाले. टाकळी ढोकेश्वर येथील एका व्यापार्‍याकडे शहर सहकारी बँकेची चार कोटी रुपयांची थकबाकी होती. बँकेने कायदेशीर कारवाई करत संबंधित व्यापार्‍याची नगर शहरातील मालमत्ता जप्त केली. नगर अर्बन बँक न्यायालयाच्या आदेशानंतरही थकबाकीदारांवर कारवाई करत नाही यामागे नेमके गौडबंगाल काय? असा सवालही चोपडा यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com